ख्राईस्टचर्च : पहिल्या कसोटीत झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर यशस्वी पुनरागमनासह आपली प्रतिष्ठाही जपण्याच्या निर्धाराने भारतीय संघ शनिवारपासून दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडविरुद्ध खेळेल. त्याचवेळी, भारताला काही अडचणींचाही समाना करावा लागणार आहे. सराव सत्रात दुखापतग्रस्त झालेला युवा फलंदाज पृथ्वी शॉ तंदुरुस्त झाला असला, तरी अनुभवी ईशांत शर्माची अनुपस्थिती भारताला महागात पडू शकते.
याशिवाय भारतीय फलंदाजांना पुन्हा एकदा आखूड टप्प्याच्या चेंडूंविरुद्ध खेळण्यासाठी तयार व्हावे लागणार आहे. वेलिंग्टन येथे पहिल्या कसोटीत फलंदाज सपशेल अपयशी ठरले ही कबुली प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलीच आहे.
हेगल ओव्हलच्या गवताळ खेळपट्टीवर विराट, चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची कडवी परीक्षा होईल. या मैदानावर एका पराभवाचा अपवाद वगळता यजमान संघाने सर्व सामने जिंकले आहेत. आखूड टप्प्याचे चेंडू टाकण्यात हातखंडा असलेला नील वॅगनरचे पुनरागमन होत असून सोबतीला टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट व कायली जेमिसन भारतीयांविरुद्ध त्वेषाने मारा करण्यास उत्सुक आहेत.
पृथ्वी शॉने शुक्रवारी नेट्सवर सराव केला. यावेळी शास्त्री व विराट या दोघांनी त्याच्या फटक्यांचे निरीक्षण केले. शास्त्री यांच्यानुसार शॉ सामना खेळू शकतो. ईशांत शर्मा टाचेच्या दुखापतीमुळे बाहेर बसेल. त्यामुळे अंतिम संघामध्ये दोन बदल होण्याची शक्यता आहे. रविचंद्रन अश्विनऐवजी रवींद्र जडेजाला तसेच ईशांतऐवजी उमेश यादव किंवा नवदीप सैनी यांच्यापैकी एकाला स्थान दिले जाईल. (वृत्तसंस्था)
उभय संघ यातून निवडणार
न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, रॉस टेलर, कोलिन डी ग्रॅन्डहोमे, बीजे वॉटलिंग, केली जेमिसन, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, नील वॅगनर आणि अजाज पटेल.
भारत : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, ईशांत शर्मा, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, शुभमान गिल, उमेश यादव, नवदीप सैनी आणि रिद्धिमान साहा.
ईशांत सामन्यास मुकणार
दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना भारताला जिंकणे अत्यावश्यक आहे. मात्र या कसोटी आधीच भारताला मोठा धक्का बसला. अनुभवी गोलंदाज ईशांत शर्मा याला दुसºया कसोटीला मुकावे लागले. उजव्या पायाच्या घोट्याच्या दुखापतीने उचल खाल्ल्यामुळे ईशांत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. जानेवारी महिन्यात विदर्भ संघाविरूद्ध रणजी सामन्यादरम्यान त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती.