माऊंट मौंगानूई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली. पहिल्या वन डे सामन्यात विजय मिळवत भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना शनिवारी माऊंट मौंगानूई येथे होणार आहे. या सामन्यात कर्णधार कोहली विजयी संघच कायम ठेवून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. कारण, हार्दिक पांड्यावरील निलंबन मागे घेण्यात आले असले तरी तो शनिवारी खेळण्याची तुर्तास शक्यता नाही. त्यामुळे अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय शंकरचा समावेश निश्चित मानला जात आहे. दुसऱ्या लढतीसाठी भारतीय संघ माऊंट मौंगानूई येथे दाखल झाला आणि शुक्रवारी त्यांनी हटके फोटोशूटही केलं.
नेपियर वन डे सामना आठ विकेट राखून जिंकताना भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाकडे विश्रांतीसाठी दोन दिवस होते आणि त्यात सरावासोबतच खेळाडूंनी न्यूझीलंडच्या पर्यटन स्थळांना भेट देण्याचा बेत आखला. भारतीय संघातील सदस्य महेंद्रसिंग धोनी, युजवेंद्र चहलत अंबाती रायुडू, केदार जाधव व कुलदीप यादव यांनी गुरुवारी येथील प्रसिद्ध स्थळ तौरंगा येथे भ्रमंती केली. त्यांचे फोटोही चांगले व्हायरल झाले.
भारतीय संघाने शुक्रवारी दुसऱ्या वन डे साठी कसून सराव केला. ओव्हल बे येथील मौरी समाजाने भारतीय खेळाडूंचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. भारतीय खेळाडूंना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही आणि संपूर्ण संघाने त्यांच्यासोबत हटके फोटो काढला. मात्र, या फोटोत कर्णधार कोहलीची अनुपस्थिती सर्वांना खटकणारी ठरली.