माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यातही दमदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी झटपट खेळी करताना किवींच्या गोलंदाजांना चांगलेच सतावले. रोहित व धवनने पहिल्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी करताना अनेक विक्रमही मोडले. न्यूझीलंडमधील ही भारतीय सलामीवीरांनी केलेली दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्याशिवाय या दोघांनी शतकी भागीदारी करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांचाही विक्रम मोडला.
शिखर धवन 66 धावांवर माघारी परतल्यामुळे ही भागीदारी 154 धावांवर संपुष्टात आली. मात्र, रोहितने आपली फटकेबाजी सुरुच राहिली. त्याने कर्णधार विराट कोहलीसह धावांची गती कायम राखण्याचा प्रयत्न केला, परंतु 30व्या षटकात तोही बाद झाला. रोहितने 96 चेंडूंत 9 चौकार व 3 षटकारांसह 87 धावांची खेळी केली. लुकी फर्ग्युसनने त्याला बाद केले. रोहितचे शतक हुकल्याची खंत असली तरी त्याने षटकारांचा विक्रम केला.
रोहितने 87 धावांच्या खेळीत 3 षटकार खेचले. त्याने खणखणीत षटकार खेचूनच अर्धशतक पूर्ण केले. 2013नंतर आंतारराष्ट्रीत क्रिकेटमध्ये त्याने 300 षटकार खेचले आहेत. या आकडेवारीत त्याच्या आसपासही कुणी नाही. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मार्टिन गुप्तीलच्या नावावर 178 षटकार आहेत. त्यापाठोपाट एबी डिव्हिलियर्स ( 171) आणि इयॉन मॉर्गन ( 171) यांचा क्रमांक येतो. 2013 नंतर वन डेत रोहितने 190 षटकार खेचले आहेत.
न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रमाशी रोहितने बरोबरी केली. त्याने न्यूझीलंडमध्ये वन डे सामन्यात 16 षटकार खेचली आहेत आणि हा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर होता. सेहवागनेही येथे 16 षटकार खेचले आहेत. या विक्रमात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 13 , सुरेश रैना 13 आणि सचिन तेंडुलकर 12 षटकारांसह अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.