ठळक मुद्देरोहित शर्मा, शिखर धवन यांचे अर्धशतककुलदीप यादवची प्रभावी गोलंदाजीभारताची मालिकेत 2-0ने आघाडी
माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : दमदार फलंदाजी आणि सुरेख गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने शनिवारी दुसऱ्या वन डे सामन्यातही न्यूझीलंडला नमवले. भारताच्या 324 धावांचा पाठलाग करताना किवी संघ 234 धावांपर्यंत मजल मारू शकला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. पुन्हा एकदा कुलदीपने ( 4 विकेट) किवी फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. डॉज ब्रेसवेलची 57 धावांची झुंज अपयशी ठरली.
रोहित शर्मा (87) आणि
शिखर धवन ( 66) यांनी रचलेल्या मजबूत पायावर भारतीय फलंदाजांनी धावांचे इमले रचले. विराट कोहली (43) व अंबाती रायुडू (47) यांनीही दमदार खेळी केली. फलंदाजांच्या चोख कामगिरीच्या जोरावर भारताने 50 षटकांत 4 बाद 324 धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीनं ( 48* ) फटकेबाजी करताना संघाला तीनशेपल्ल्याड मजल मारून दिली.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला साजेशी सुरुवात करता आली नाही. त्यांचे फलंदाज थोड्या थोड्या फरकाने बाद होत होते. कर्णधार केन विलियम्सनने फटकेबाजी करताना आशेचा किरण दाखवला, परंतु मोहम्मद शमीच्या चेंडूवर त्याचा फटका चुकला. त्याला त्रिफळाचीत होऊन माघारी जावे लागले. रॉस टेलर, टॉम लॅथम व हेन्री निकोल्स याच्यांकडून असलेल्या अपेक्षा फोल ठरल्या. कुलदीप यादवने ( 4/45) न्यूझीलंडच्या फलंदाजांना चकवले. डॉज ब्रेसवेलने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करून पाठीराख्यांचे मनोरंजन केले. त्याने लॉकी फर्ग्युसनसह नवव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ब्रेसवेलने 35 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांच्या सहाय्याने अर्धशतक पूर्ण केले. पण त्याची ( 57) ही खेळी संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही.