ठळक मुद्देभारतीय संघाने शनिवारी दुसऱ्या वन डे सामन्यातही न्यूझीलंडला नमवले. रोहित शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.न्यूझीलंडमध्ये धावांच्या फरकाने भारताचा सर्वात मोठा विजय
माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने शनिवारी दुसऱ्या वन डे सामन्यातही न्यूझीलंडला नमवले. भारताच्या 324 धावांचा पाठलाग करताना किवी संघ 234 धावांपर्यंत मजल मारू शकला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. पुन्हा एकदा कुलदीपने ( 4 विकेट) किवी फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. डॉज ब्रेसवेलची 57 धावांची झुंज अपयशी ठरली. प्रजासत्ताक दिनी भारताला प्रथमच विजय मिळवता आला. याआधी प्रजासत्ताक दिनी झालेल्या तीन सामन्यात भारताला विजय मिळवता आला नव्हता. 87 धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
रोहित शर्मा (87) आणि शिखर धवन ( 66) यांनी रचलेल्या मजबूत पायावर भारतीय फलंदाजांनी धावांचे इमले रचले.
विराट कोहली (43) व अंबाती रायुडू (47) यांनीही दमदार खेळी केली. फलंदाजांच्या चोख कामगिरीच्या जोरावर भारताने 50 षटकांत 4 बाद 324 धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीनं ( 48* ) फटकेबाजी करताना संघाला 4 बाद 324 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 40.2 षटकांत 234 धावांवर माघारी परतला. डॉज ब्रेसवेलने ( 57) एकाकी झुंज दिली.
न्यूझीलंडमधील भारताचा हा वन डेतील सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी 2009 मध्ये भारताने न्यूझीलंडला 84 धावांनी नमवले होते.
प्रजासत्ताक दिनी भारताने प्रथमच विजय मिळवला. यापूर्वी भारताने 1986, 2000 आणि 2015 साली 26 जानेवारीला वन डे सामना खेळला होता. परंतु त्यापैकी दोन सामन्यांत भारताचा पराभव झाला, तर एक सामना अनिर्णीत राहिला. 2015मध्ये सिडनीत भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचा निकाल लागला नाही. 2000 आणि 1986 साली अॅडलेड येथे ऑस्ट्रेलियाकडूनच भारताला पराभव पत्करावा लागला होता.