वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : न्यूझीलंडविरुद्धची वन डे मालिका खिशात घातल्यानंतर भारतीय संघ ट्वेंटी-20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळे ट्वेंटी-20 मालिकेत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात रोहितने अंतिम अकरा जणांमध्ये कृणाल पांड्याला संधी दिली. कृणालला संधी मिळताच पांड्या बंधूंच्या नावे विक्रम झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिक व कृणाल हे पांड्या बंधू प्रथमच एकत्र खेळणार आहेत.
सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या हार्दिकचे संघातील स्थान पक्के आहे. कृणालही ट्वेंटी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. पांड्या बंधूंनी मंगळवारी कसून सरावही केला आणि पहिल्या सामन्यात एकत्र खेळण्यासाठी ते आतूर झाले होते आणि त्यांचे हे स्वप्न आज पूर्ण झाले. अमरनाथ व पठाण बंधूंनंतर भारताकडून एकाच आंतरराष्ट्रीय सामन्यात एकत्र खेळणारे ते तिसरे बंधू ठरले आहेत. मोहिंदर आणि सुरिंदर अमरनाथ यांनी अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचे वडील लाला अमरनाथ हे भारताकडून कसोटीत शतक करणारे पहिले फलंदाज होते.
इरफान व युसूफ पठाण हे 2009 च्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात प्रथमच एकत्र खेळले होते आणि त्या दोघांनी आठव्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी करताना भारताला विजय मिलवून दिला होता. योगायोग म्हणजे पठाण बंधू व पांड्या बंधू हे बडोद्याचे आहेत. युसूफ अजूनही बडोद्याकडून खेळतो, तर इरफान जम्मू-काश्मिरचे प्रतिनिधित्व करतो. कृणाल व हार्दिक यांना इंग्लंडमध्ये एकत्र खेळण्याची संधी होती, परंतु ट्वेंटी-20 सामन्यात तसे झाले नाही. कृणालने वेस्ट इंडिजविरुद्ध ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले, तर हार्दिकला दुखापतीमुळे त्या सामन्याला मुकावे लागले होते. त्यानंतर कृणाल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतही खेळला होता.