वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : कॉलीन मुन्रो आणि टीम सेइफर्ट यांनी न्यूझीलंडला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. सेइफर्टने 43 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकार खेचून 84 धावा केल्या. त्याला मुन्रो ( 34), कर्णधार केन विलियम्सन ( 34), रॉस टेलर ( 23) आणि स्कॉट कुगलेंजने ( 20*) यांनी साथ दिली. भारताकडून हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या. न्यूझीलंडने 20 षटकांत 6 बाद 219 धावांचा डोंगर उभा केला. मागील अडीच वर्षांत भारतीय संघाला प्रथमच प्रतिस्पर्धी संघाने 200 पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य दिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पूर्ण सदस्यांमध्ये केवळ पाकिस्तानचाच संघ आहे की ज्यांच्याविरोधात मागील अडीच वर्षांत प्रतिस्पर्धी संघाला 200 पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य उभे करता आलेले नाही.
मुन्रो व सेइफर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी करताना किवींना दमदार सलामी दिली. मात्र, कृणाल पांड्याने ही जोडी फोडली. त्याने मुन्रोला विजय शंकर करवी झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानंतर कर्णधार केन विलियम्सन व सेइफर्टने किवींची धावगती कायम राखली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या. सेइफर्टने 43 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकार खेचून 84 धावा केल्या. विलियम्सनने 34, रॉस टेरलने 23 आणि स्कॉट कुगलेंजने नाबाद 20 धावांची खेळी केली. न्यूझीलंडने भारताला 220 धावांचे लक्ष्य दिले.
भारताविरुद्धची आणि वेलिंग्टन येथील न्यूझीलंडची ही ट्वेंटी-20 मधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. यासह न्यूझीलंडची ही तिसरी सर्वोत्तम खेळी आहे. त्यांनी 2018 मध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध अनुक्रमे 5 बाद 243 व 6 बाद 243 धावा चोपल्या होत्या.