Join us  

India vs New Zealand 1st ODI : कॅप्टन कोहलीनंतर 'गब्बर'च, शिखर धवनची लाराच्या विक्रमाशी बरोबरी 

India vs New Zealand 1st ODI : गब्बर धवनने या सामन्यात वन डे क्रिकेटमधील 5000 धावांचा पल्ला ओलांडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 11:07 AM

Open in App
ठळक मुद्देशिखर धवनने या सामन्यात वन डे क्रिकेटमधील 5000 धावांचा पल्ला ओलांडलावेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराच्या विक्रमाशी बरोबरीमाजी कर्णधार सौरव गांगुलीलाही मागे टाकले

नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताने पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 157 धावांवर माघारी पाठवून विजयाच्या दिशेने सुसाट कूच केली. 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. गब्बर धवनने या सामन्यात वन डे क्रिकेटमधील 5000 धावांचा पल्ला ओलांडला. त्याने या कामगिरीसह कॅप्टन विराट कोहलीलाही टक्कर देण्याचा प्रयत्न केला आणि ब्रायन लाराच्या विक्रमाशी बरोबरी केली.

भारतीय गोलंदाजांनी कामगिरी चोख बजावताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 157 धावांवर माघारी पाठवला. पहिल्या वन डे सामन्यात भारताला विजयासाठी अवघ्या 158 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यात कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमी 3 आणि युजवेंद्र चहलने 2 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. या सामन्यात मोहम्मद शमीने सर्वात जलद शंभर विकेट्स घेण्याचा विक्रम नावावर केला. 

त्याने 56 सामन्यांत ही कामगिरी करताना इरफान पठाणचा ( 59 सामने) विक्रम मोडला. या क्रमवारीत झहीर खान ( 65 ), अजित आगरकर ( 67 ) आणि जावगल श्रीनाथ ( 68 ) हे अव्वल पाचमध्ये येतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये अफगाणिस्तानच्या रशिद खानच्या नावावर सर्वात जलद शंभर विकेट घेण्याचा विक्रम आहे. त्याने 44 सामन्यांत हा पराक्रम केला. शमीने या यादित सहावे स्थान पटकावत न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टशी बरोबरी केली. 

लक्ष्याचा पाठलाग करताना धवन आणि रोहित यांनी चांगली सुरुवात केली. धवनने 118 डावांत 5000 वन डे धावा पूर्ण केल्या. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारा तो भारताचा दुसरा जलद फलंदाज ठरला. कोहलीने 114 डावांत 5000 धावांचा पल्ला ओलांडला होता. त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीचा ( 126 डाव) विक्रम मोडला. सर्वात जलद 5000 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला 101 डावांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर सर व्हीव्हीयन रिचर्ड्स व कोहली संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. धवनने आजच्या या विक्रमासह ब्रायन लाराच्या विक्रमाशी बरोबरी केली. लारानेही 118 डावांमध्ये 5000 वन डे धावा केल्या होत्या.  

टॅग्स :शिखर धवनभारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीसौरभ गांगुली