दुबई : इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीच्या फलंदाजीच्या यादीत मागे टाकले आहे. रुट तिसऱ्या तर विराट पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
जसप्रीत बुमराह आणि अश्विनदेखील गोलंदाजी यादीत वर आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत ११ आणि ७२ धावांची खेळी करणाऱ्या कोहलीचे ८५२ गुण आहेत आणि बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे. अनुभवी फिरकी गोलंदाज अश्विन आणि वेगवान गोलंदाज बुमराह यांना एका स्थानाचा फायदा झाला असून ते अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर पोहोचले आहेत.
चेन्नईत २२७ धावांची संस्मरणीय विजय नोंदवण्यात आपल्या संघाची मदत करणाऱ्या रुटने इंग्लंडला आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशीपच्या शर्यतीत कायम ठेवले आहे. त्यांचे रेटिंग ८८३ रेटिंग गुण आहेत. आशिया खंडातील तीन कसोटीत (दोन श्रीलंकेविरुद्ध) ६८४ धावा करणाऱ्या रुटचे सप्टेंबर २०१७ नंतरचे हे क्रमवारीतील सर्वोत्तम स्थान आहे.
इंग्लंडचा एक अन्य फलंदाज डॉम सिब्लेदेखील ताज्या रँकिंगमध्ये ३५ व्या स्थानावर पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स अव्वल स्थानावर आहे. जेम्स अँडरसनने सहाव्या स्थानावरुन तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तो आपल्या देशाच्या स्टुअर्ट ब्रॉडपेक्षा फक्त चार गुणांनी पिछाडीवर आहे.
ऑफस्पिनर जॅक लीच आणि डॉमिनिक बेस अनुक्रमे ३७ व ४१ व्या स्थानावर पोहोचले आहेत. वेस्ट इंडीजचा फलंदाज कायले मेयर्सने चटगावमध्ये ४० आणि नाबाद २१० धावांची खेळी करीत बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत शानदार विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
गोलंदाजांना झाला लाभ
नोव्हेंबर २०१७ नंतर प्रथमच कोहलीच्या पुढे झालेला रुट आता अव्वल मानांकनावर काबीज असणाऱ्या केन विलियम्सनच्या ३६ आणि स्टीव्ह स्मिथच्या फक्त आठ गुणांनी मागे आहे. ऋषभ पंत पहिल्या डावात ९१ धावा काढून ७०० रेटिंग गुणापर्यंत पोहोचणारा देशाचा पहिला पूर्णवेळ यष्टिरक्षक बनला आहे. तसेच तो फलंदाजीच्या यादीत १३ व्या स्थानावर कायम आहे. सलामीवीर फलंदाज शुभमन गिल सात क्रमांकाच्या फायद्याने ४० तर अष्टपैलू वाॅशिंग्टन सुंदर ८१ स्थानावर पोहोचला आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम यालादेखील दोन स्थानांचा फायदा झाला आहे. त्यामुळे तो गोलंदाजांच्या ८५ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.