मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली कंबरेच्या दुखण्याने त्रस्त आहे. त्यामुळे इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीतील त्याच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, BCCIने विराट पूर्णपणे फिट असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विराट चाहत्यांमध्ये आनंदाचा उत्साह संचारला आहे.
लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत विराटला कंबर दुखीचा त्रास झाला होता. इंग्लंडच्या फलंदाजीच्या वेळी कोहली 37 मिनिटे सीमारेषे बाहेर बसला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात तो फलंदाजीला चौथ्या क्रमांकावर आला नाही. दुखापतीमुळे कोहली खेळणार की नाही, अशी चिंता लागली होती. पण, त्याने गुरूवारी संघासोबत कसून सराव केला.
कोहलीच्या तंदुरूस्तीमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे आणि तिसऱ्या कसोटीतून मालिकेत कमबॅक करण्यासाठी संघ सज्ज झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट (240 धावा) आघाडीवर आहे. इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो 191 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.