ओव्हल, भारत वि. इंग्लंड - पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय खेळाडूंनी इभ्रत वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांनी द्विशतकी भागीगारी करताना संघाच्या आशा जिवंत राखल्या होत्या, परंतु इंग्लंडने पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत सामना जिंकला. यजमानांनी ओव्हल कसोटीत 118 धावांनी विजय मिळवताना पाच सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली.
464 धावांचा पाठलाग करणे भारतीय संघासाठी सोपी गोष्ट नव्हती. त्यात भारताचे आघाडीचे तीन फलंदाज अवघ्या दोन धावांवर माघारी परतले. जेम्स अँडरसनने सलामीवीर शिखर धवनला बाद केल्यानंतर चेतेश्वर पुजारा व विराट कोहलीही त्वरित माघारी परतले. त्यानंतर राहुलने 149 धावांची खेळी करताना अजिंक्य रहाणे ( 37) आणि रिषभ पंत ( 114) यांच्यासह महत्त्वाची भागीदारी करून संघाला तीनशेचा पल्ला गाठून दिला. मात्र, इंग्लंडने कमबॅक करताना सामना जिंकण्यात यश मिळवले.
भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने भारतीय संघाच्या कामगिरीवर तीव्र नाराजी प्रकट केली. संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असल्याने भारताचा पराभव झाल्याचे त्याने सांगितले. त्याच वेळी त्याने राहुल व पंत यांच्यासह गोलंदाजांचे कौतुक केले. संघातील अन्य खेळाडूंचे कान टोचताना सेहवागने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आठवण करून दिली.