Join us

India vs England Test: पृथ्वी शॉला पाचव्या कसोटीत संधी, कोणाला मिळणार डच्चू?

India vs England Test: मुंबईकर पृथ्वी शॉ भारताच्या वरिष्ठ क्रिकेट संघाकडून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या व अखेरच्या कसोटी मालिकेत संघात संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 12:19 IST

Open in App

ओव्हल, भारत वि. इंग्लंड कसोटीः मुंबईकर पृथ्वी शॉ भारताच्या वरिष्ठ क्रिकेट संघाकडून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या व अखेरच्या कसोटी मालिकेत संघात संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा माजी कर्णधार पृथ्वीला पाचव्या कसोटीत संधी मिळणार आहे. 

पृथ्वीच्या मार्गदर्शनाखाली भारताने 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा जिंकली होती आणि मागील वर्षभरात तो सातत्याने धावा करत आहे. लंडन दौऱ्यावर भारत अ संघाकडून खेळताना पृथ्वीने सातत्यपूर्ण खेळी केली. त्याशिवाय मायदेशात झालेल्या दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध त्याने 136 धावांची खेळी केली होती. 

इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी संघासाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात सलामीवीर मुरली विजयच्या जागी पृथ्वीला संघात स्थान देण्यात आले होते. मात्र, त्याला चौथ्या कसोटीत अंतिम अकरामध्ये जागा मिळाली नाही, परंतु पाचव्या कसोटीत लोकेश राहुलच्या जागी त्याला संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. राहुलला 8 डावांमध्ये मिळून 113 धावाच करता आल्या आहेत. 

पृथ्वीने 14 प्रथम श्रेणी, 19 लिस्ट A आणि 9 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 26 डावांत 7 शतकं झळकावली आहेत. रणजी करंडक आणि दुलीप चषक स्पर्धेत पदार्पणातच त्याने शतक ठोकलं होतं. पाचव्या कसोटीला 7 सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडपृथ्वी शॉक्रिकेट