ठळक मुद्देभारतीय खेळाडू आत्ममग्न होते. अहंकारानिशी ते इंग्लंडच्या दौऱ्यावर आले होते. आपल्या इंग्लंडमध्येही धावा होतील, असा त्यांचा गैरसमज होता. तो आता दूर झाला असेल, असे बॉयकॉट यांनी सांगितले.
लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत आतापर्यंत पाहुण्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही. यापूर्वी भारताने आपल्या देशात झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली होती. पण त्यांना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमधील कसोटी सामन्यांत चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांना फक्त पाटा खेळपट्टीवरच खेळण्याची सवय आहे. इंग्लंडमध्ये खेळण्याची त्यांच्याकडे रणनीतीच नाही, अशी टीका इंग्लंडचे माजी महान फलंदाज जेफ्री बॉयकॉट यांनी केली आहे.
बॉयकॉट म्हणाले की, " भारतीय खेळाडू आत्ममग्न होते. अहंकारानिशी ते इंग्लंडच्या दौऱ्यावर आले होते. आपल्या इंग्लंडमध्येही धावा होतील, असा त्यांचा गैरसमज होता. तो आता दूर झाला असेल. इंग्लंडमध्ये खेळायचे असेल तर त्यासाठी चांगली रणनीती आखावी लागते. भारताने ही गोष्ट केलीच नाही, त्यामुळे त्यांना दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. "
भारतीयांना पाटा खेळपट्टीचीच सवय
भारताच्या खेळाडूंना सपाट खेळपट्टीवर खेळण्याची सवय जडली आहे. खेळपट्टी पाटा असली की त्यांच्याकडून धावा पाहायला मिळतात. त्याच्या जोरावर ते विजय मिळवतात. पण परदेशातील खेळपट्ट्या या पाटा नसतात. त्यामुळे या खेळपट्टीवर तुम्ही कशी फलंदाजी करायला हवी, याचा विचार करायला हवा, असे बॉयकॉट यांनी सांगितले.