Join us

ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय

पहिल्या तीन कसोटींमध्ये वापरलेले चेंडू लवकरच नरम पडत असल्याने आणि ३० षटकांनंतर त्यांचा आकार बिघडत असल्याने मैदानी पंचांनी वारंवार चेंडू बदलले. यादरम्यान बराच वेळ वाया गेला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 05:36 IST

Open in App

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत वापरल्या जात असलेल्या ‘सॉफ्ट’ ड्युक्स चेंडूवर प्रचंड टीका झाल्यानंतर ड्युक्स चेंडू तयार करणाऱ्या कंपनीने सखोल तपासणी करण्याची आणि चेंडूमध्ये सुधारणा करण्याची तयारी दर्शविल्याचे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे.

पहिल्या तीन कसोटींमध्ये वापरलेले चेंडू लवकरच नरम पडत असल्याने आणि ३० षटकांनंतर त्यांचा आकार बिघडत असल्याने मैदानी पंचांनी वारंवार चेंडू बदलले. यादरम्यान बराच वेळ वाया गेला होता. भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड यांनी या चेंडूंवर टीका केल्यानंतर ईसीबीने वापरलेले चेंडू गोळा करून आठवड्याअखेर ड्युक्स कंपनीकडे परत पाठविण्याचा निर्णय घेतला.

‘आम्ही चेंडू परत घेऊ. त्यांची तपासणी करू. चामडे पुरवणाऱ्यांशी तसेच इतर कच्चा माल पुरवठादारांशी चर्चा करू. जे जे आवश्यक असेल ते सर्व बदल करावे लागल्यास करण्याची आमची तयारी आहे,’ असे ड्युक्स चेंडू बनविणाऱ्या ‘ब्रिटिश क्रिकेट बॉल्स लिमिटेड’चे मालक दिलीप जाजोदिया यांनी बीबीसी स्पोर्ट्सला सांगितले. कसोटी मालिकेसाठी कोणता चेंडू वापरायचा, हे यजमान क्रिकेट बोर्ड ठरविते. इंग्लंडमध्ये ‘ड्युक्स’, तर भारतात एसजी चेंडू आणि ऑस्ट्रेलियात  कूकाबुरा चेंडू वापरला जातो. ड्युक्स चेंडूचे उत्पादन १७६० पासून सुरू आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत कसोटी आणि काैंटी क्रिकेटमध्ये या चेंडूमुळे अनेकदा समस्या उद्भवल्या. 

लॉर्डस् कसोटीत दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात दुसरा नवीन चेंडू बदलावा लागल्यावर शुभमन गिल नाराज झाला होता. मूळ चेंडूने जसप्रीत बुमराहने तीन जलद बळी घेतले होते. पण, चेंडू बदलल्यानंतर संपूर्ण सत्रात त्याला एकही बळी मिळवता आला नाही. ब्रॉडनेही या नवीन चेंडूवर नाराजी व्यक्त केली होती. इंग्लंडने लॉर्ड्स आणि लीड्स येथील विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे, तर भारताने एजबस्टनमध्ये विजय मिळविला होता. 

चेंडू बदलण्याचे नियम...चेंडू हरविणे : सामन्यातील चेंडू हरविल्यास किंवा स्टेडियमबाहेर गेल्यास. चेंडूच्या आकारात बदल : चेंडूचा शेप बदलून तो मोठा झाला किंवा फाटल्यास. चेंडू खराब झाल्यास आणि चेंडू कुरतडल्यास, त्यावर चकाकी आणण्यासाठी वॅक्स लावल्यास.(मैदानी पंच चेंडूचा शेप तपासण्यासाठी वारंवार आयसीसीने आखून दिलेल्या नियमानुसार विशिष्ट रिंगमध्ये टाकून आकार योग्य असल्याची खात्री करून घेतात.)

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंड