Join us  

Ind vs Eng: आर.अश्विनला इतक्या विकेट्स कशा मिळाल्या? लक्ष्मणनं सांगितलं रहस्य

R. Ashwin, Ind vs Eng: अश्विनच्या यशस्वी कारकिर्दीचं रहस्य काय? या विषयावर बोलताना लक्ष्मण यांनी सविस्तरपणे अश्विनच्या गोलंदाजीचं विश्लेषण केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 3:47 PM

Open in App

भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (R Ashwin) अत्यंत हुशार आणि खूप विचार करुन गोलंदाजी करणारा गोलंदाज असल्याचं भारताचे माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) म्हणाले. अश्विनच्या यशस्वी कारकिर्दीचं रहस्य काय? या विषयावर बोलताना लक्ष्मण यांनी सविस्तरपणे अश्विनच्या गोलंदाजीचं विश्लेषण केलं. ते स्टारस्पोर्ट्स वाहिनीवरील 'क्रिकेट कनेक्टेड' या शोमध्ये बोलत होते. (R Ashwin Wants To Be The Best Competes With The Best Says VVS Laxman)

"अश्विन अतिशय समजूतदार आणि हुशार गोलंदाज आहे. जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळत असता तेव्हा फक्त तुमचं कौशल्यच नव्हे, तर तुम्ही केलेली तयारी आणि तुमच्यात घडवलेला सुयोग्य बदल या गोष्टी देखील अतिशय महत्वाच्या ठरतात", असं लक्ष्मण म्हणाले. 

अहमदाबाद कसोटीत आर.अश्विनने इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची विकेट घेऊन आपल्या कसोटी कारकिर्दीतील ४०० बळींचा टप्पा ओलांडला. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी घेणारे अश्विन चौथा भारतीय गोलंदाज ठरला. भारतीय संघानं अहमदाबाद कसोटी अवघ्या दोन दिवसांत १० विकेट्सनं जिंकली. ३४ वर्षीय अश्विननं श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरण यांच्यानंतर सर्वात कमी सामन्यांमध्ये ४०० बळींचा आकडा गाठण्याची किमया साधली. 

"फलंदाजाच्या कमकुवत बाजू काय आहेत याची पूर्वतयारी करुनच अश्विन मैदानात उतरतो. त्यानुसार योजना आखतो. हिच गोष्ट अश्विनला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करते", असं लक्ष्मण म्हणाला. अश्विनबाबतची ही गोष्ट पटवून देण्यासाठी यावेळी लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं उदाहरण देखील दिलं. "ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपण पाहिलंच असेल की अश्विननं स्टीव्ह स्मिथला कशा पद्धतीनं जखडून ठेवलं होतं. हीच गोष्ट अश्विनला सर्वश्रेष्ठ खेळाडू असल्याचं सिद्ध करते. स्टीव्ही स्मिथ विरुद्ध त्यानं केलेली गोलंदाजी दाखवून देते की मलाही सर्वोत्तम खेळाडूची विकेट घेऊन आपली ताकद दाखवून द्यायचीय", असं लक्ष्मण म्हणाले.  

टॅग्स :आर अश्विनभारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय