India vs England ODI Series Schedule: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर आता या दोन्ही संघात वनडे मालिकेची रंगत पाहायला मिळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आधी दोन्ही संघासाठी ही रंगीत तालीम असेल. या सामन्यात भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी आधीची शेवटची मालिका आहे. त्यामुळे ही मालिका अधिक रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे. जाणून घेऊयात भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेसंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कधी अन् कुठं रंगणार वनडे सामन्यांचा थरार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारीला विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या नागपूरच्या मैदानात रंगणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना कटकच्या बाराबती च्या मैदानात ९ फेब्रुवारीला खेळवण्यात येईल. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना १२ फेब्रुवारीला जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड द्विपक्षीय मालिकेचे वेळापत्रक
- पहिला एकदिवसीय सामना - गुरुवारी ६ फेब्रुवारी-नागपूर
- दुसरा एकदिवसीय सामना - रविवारी ९ फेब्रुवारी कटक
- तिसरा एकदिवसीय सामना - बुधवारी १२ फेब्रुवारी अहमदाबाद
हे तिन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरु होतील. सामन्याआधी अर्धा तास दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.
कुठं अन् कसा पाहता येईल भारत-इंग्लंड यांच्यातील वनडे सामने?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार अॅप आणि वेब साइटवर उपलब्ध असेल. याशिवाय टेलिव्हिटनवरील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्यांचे थेट प्रेक्षपण करण्यात येणार आहे.
सात महिन्यानंतर टीम इंडिया खेळणार वनडे मालिका
जवळपास सात महिन्यांच्या अंतरानंतर भारतीय संघ वनडे सामना खेळणार आहे. याआधी भारतीय संघानं श्रीलंका दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी आधी घरच्या मैदानातील इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकून भारतीय संघ आत्मविश्वासानं दुबईला रवाना होण्यासाठी उत्सुक असेल. दुसरीकडे इंग्लंडचा संघ टी-२० मालिकेतील पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.