Join us  

India VS England : विराटला सहकार्य करणे हेच माझे काम : अजिंक्य रहाणे

Ajinkya Rahane News : आगामी मालिकेत संघाला आत्मसंतुष्ट राहता येणार नाही. गाफिल राहण्यात कुठलाही शहाणपणा नसल्याचे मत अजिंक्यने बुधवारी सरावानंतर व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 6:27 AM

Open in App

चेन्नई  - अजिंक्य रहाणे याने कर्णधार या नात्याने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला होता. इंग्लंडविरुद्ध उद्या, शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या आव्हानात्मक मालिकेत विराट कोहली याला तो सहकार्य करणार आहे. आगामी मालिकेत संघाला आत्मसंतुष्ट राहता येणार नाही. गाफिल राहण्यात कुठलाही शहाणपणा नसल्याचे मत अजिंक्यने बुधवारी सरावानंतर व्यक्त केले. या मालिकेतील निकालाद्वारे जूनमध्ये लाॅर्डसवर न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी मालिकेचा अंतिम सामना खेळणारा संघ कोणता याचा निर्णयही होणार आहे.अजिंक्य म्हणाला, ‘माझे काम पडद्यामागे राहून विराटला मदत करणे हेच असेल. माझे काम पूर्वीपेक्षा खरे तर सोपे होणार आहे. आता विराट मला जे विचारेल त्यासाठी सहकार्य करीन. विराट कर्णधार होता, मात्र तो कौटुंबिक कारणास्तव मायदेशी परत आल्यानंतर मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नेतृत्वपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.’ ऑस्ट्रेलिया मालिकेतील विजय आता भूतकाळात जमा झाला आहे. आम्ही वर्तमानात काय करायचे याचा विचार करीत आहोत. श्रीलंकेला क्लीन स्विप देणाऱ्या इंग्लंड संघाचे कौतुक करतो. त्यांच्या प्रत्येक खेळाडूचा आमच्या मनात आदर आहे. या संघाला आम्ही सहजपणे घेणार नसून अत्यंत उच्च दर्जाचा खेळ या मालिकेत चाहत्यांना पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी अद्याप चार महिने शिल्लक आहेत. त्याआधी सध्याच्या मालिकेत विजय कसा मिळवावा, यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे अजिंक्यने सांगितले.न्यूझीलंडने अलीकडे फार चांगला खेळ केला असल्याने हा संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीचा हक्कदार ठरतो. आम्ही मात्र सध्या त्या गोष्टीचा विचार सोडून एकावेळी एका सामन्यावर लक्ष देणार आहोत. संघ संयोजनाबाबत विचारताच अजिंक्य म्हणाला, ‘चेपॉकची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असेल, असा अंदाज आहे.’ भारतात अनेक खेळपट्ट्यांवर नेहमी फिरकीपटूंचे वर्चस्व राहिले आहे. आम्ही स्वत:ला सज्ज ठेवू. इंग्लंड संघही सर्व तयारीनिशी आला असल्याने वाटते तितके सोपे युद्ध नाही, असे अजिंक्यने सांगितले. 

टॅग्स :अजिंक्य रहाणेविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ