- अयाझ मेमन
भारताने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध शानदार बाजी मारली आणि या विजयाचा आगामी दोन सामन्यांसाठी खूप मोठा फायदा भारतीयांना होईल. पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताने हा विजय मिळवला. काहींनी भारत ही मालिका ५-० अशा फरकाने गमावेल असे भाकीत व्यक्त केले होते. याविजयामुळे भारताने मालिकेला एक वेगळे वळण दिले आहे. या सामन्यात इंग्लंड संघ पूर्णपणे उध्वस्त झालेला दिसला. ते फलंदाजी, गोलंदाजीमध्ये सपशेल अपयशी ठरले. आता चौथ्या सामन्यात भारताचा आत्मविश्वास वाढला असणार आणि याचा त्यांना मानसिकरीत्या फायदा होईल.
हा सामना गाजवला तो जसप्रीत बुमराहने. त्याने जबरदस्त गोलंदाजी केली. विशेष म्हणजे खेळपट्टीनुसार त्याने मारा केला आणि इंग्लंडचे फलंदाज कोलमडले. बुमराहची गोलंदाजी किंवा त्याची शैली समजून घेणे कठीण आहे. तसेच त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता खूप आहे. त्यामुळे फलंदाज गोंधळून जातो. विशेष म्हणजे दुखापतीतून सावरुन इतका चांगला मारा करणे हेच माझ्या दृष्टीने मोठे यश आहे. जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांच्यातील वाढती भागीदारी चिंतेचा विषय बनत होती. पण बुमराहने मोक्याच्यावेळी निर्णायक स्पेल टाकत सामना भारताच्या बाजूने झुकवला.
शिवाय पहिल्या दोन पराभवानंतर विराट कोहलीच्या नेतृत्त्वावरही प्रश्न निर्माण झाले. त्याच्यावर टीकाही झाली. त्याची एक खासियत आहे की, जेव्हा कधी अडचणी असतात त्याचा वैयक्तिक खेळ जबरदस्त होतो. असे खूप कमी खेळाडूंमध्ये पाहायला मिळते.
एक नाव घ्यायचे झाल्यास असा खेळ ब्रायन लाराचा होता. जेव्हा कधी वेस्ट इंडिज संघ अडचणीत असायचा, तेव्हा लारा छाप पाडून जायचा. पण एक फरक आहे की कोहलीकडे लाराच्या तुलनेत मजबूत संघ आहे. या सामन्यात कोहलीसह अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांनीही चांगली फलंदाजी केली. माझ्यामते एक फलंदाज म्हणून कोहली आधीच महान खेळाडू बनला आहे आणि कर्णधार म्हणून तो महानतेच्या मार्गावर आहे. तो कायम शिकत असतो आणि त्यातून प्रगतीही करतो.
चुका मान्य करणे ही सर्वात मोठी गोष्ट त्याच्या स्वभावामध्ये आहे. त्यातून तो प्रगती करत आहे. त्याने गेल्या वेळच्या इंग्लंड दौºयातील चुका टाळल्या. त्यावेळी केलेल्या चुकांमधून त्याने एक धडा घेतला. तो एक लढवय्या आहे. आता पुढच्या सामन्यासाठी खेळपट्टी पाहून संघाविषयी निर्णय घेण्यात येतील. तिसºया सामन्यात सर्वच खेळाडू चमकल्याने माझ्यामते चौथ्या सामन्यासाठी संघ कायम राहिल असे वाटते.