Join us

India Vs England, Latest News : बाराव्या खेळाडूने मिळवून दिले भारताला पहिले यश

भारतीय संघातील अकरा खेळाडूंनी इंग्लंडच्या सलामीवीरांपुढे जवळपास हात टेकले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 16:55 IST

Open in App

बर्मिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडच्या सलामीवीरांनी तुफानी फलंदाजी करत भारताच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले होते. भारतीय संघातील अकरा खेळाडूंनी इंग्लंडच्या सलामीवीरांपुढे जवळपास हात टेकले होते. पण भारताचा बारावा खेळाडू मैदानात आला आणि त्याने भारताला पहिले यश मिळवून दिले.

भारताला जेसन रॉयच्या रुपात पहिले यश मिळाले. रॉय आणि जॉनी बेअरस्टोव यांनी भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत दोघांनी अर्धशतके झळकावली. या दोघांनी 160 धावांची सलामी दिली. यानंतर रॉयने कुलदीप यादवच्या चेंडूवर मोठा फटका लगावला. हा चेंडू आता चौकार जाणार असे वाटत होते. पण मैदानात आलेल्या बाराव्या खेळाडूने सूर लगावत झेल टिपला आणि भारताला पहिले यश मिळाले. हा झेल टिपला तो बारावा खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या रवींद्र जडेजाने. कारण क्षेत्ररक्षण करताना लोकेश राहुलला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे बारावा खेळाडू म्हणून जडेजा मैदानात आला होता.

भारताला मोठा धक्का; लोकेश राहुलला दुखापतइंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्ध क्षेत्ररक्षण करत असताना राहुल पाठिवर पडला आणि त्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्यामुळे राहुलला मैदानाबाहेर पाठवण्यात आले आहे. ही दुखापत जर फार गंभीर असेल तर त्याला या सामन्यात फलंदाजीबी करता येणार नाही.

जॉनी बेअरस्टोव हा 48 धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी जॉनीने एक मोठा फटका लगावला. हा चेंडू षटकार जाणार की राहुल झेल पकडणार, याबाबत उत्सुकता होती. सीमारेषेवर राहुल झेल पकडायला गेला. पण त्याला चेंडूचा योग्य अंदाज आला नाही. तरीही राहुल झेल पकडायला गेला आणि सीमारेषेबाहेर पाठीवर पडला. त्यावेळी राहुलला दुखापत झाली.

जेसन रॉय बाद होता, पण धोनी-कोहलीनं DRS घेतला नाही जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडला सकारात्मक सुरुवात करून दिली. दुखापतीतून सावरणाऱ्या रॉयनं भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला, शिवाय त्याला नशीबाचीही  साथ मिळाली. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्यानं टाकलेल्या 11 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रॉयला जीवदान मिळालं. रॉय व बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रॉय बाद असल्याची अपील भारतीय खेळाडूंनी केली, परंतु त्यावर DRS न मागितल्याचा फटका भारताला बसला.

पांड्यानं टाकलेला चेंडू व्हाईडच्या दिशेनं गेला, परंतु त्याला छेडछाड करण्याचा मोह रॉयला आवरता आला नाही. चेंडू त्याच्या ग्लोव्हजला घासून यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या हातात विसावला. धोनीनं त्वरित अपील केले, परंतु पंचांनी व्हाईडचा सिग्नल दिला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली व पांड्या धोनीकडे आले. पण, धोनीनं DRS न घेण्यास सांगितले. त्यानंतर रिप्लेत पाहिले असता रॉय बाद असल्याचे स्पष्ट दिसत होते, त्यामुळे DRS चा निर्णय घेतला असता तर भारताला पहिले यश मिळाले असते, असे चाहत्यांना वाटले.

टॅग्स :रवींद्र जडेजावर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध इंग्लंड