नवी दिल्ली : इंग्लंड संघ भारतात कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे. या संघाचा कर्णधार ज्यो रुट हा भारतीय फिरकीपटूंपुढे मोठे आव्हान उभे करेल. तो फिरकीपुढे फार कमी वेळा बाद होत असल्याने या दौऱ्यात भारताच्या फिरकी गोलंदाजांना पुरून उरेल, असा दावा संघातील वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने केला. लंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत रुटने द्विशतकी खेळीसह सर्वाधिक धावांचे योगदान दिले होते. एका वृत्तपत्रात लिहिलेल्या स्तंभात ब्रॉड म्हणाला, ‘सतत आपल्या खेळीत सुधारणा केली नाही तर शतकी खेळीसारखा मैलाचा दगड गाठू शकत नाही. ज्यो रुट मात्र सतत कामगिरी सुधारणारा खेळाडू आहे. त्याच्यात सुधारणा करण्याची कामगिरी उंचावण्याची भूक असल्याने तो १५० कसोटी सामने सहज खेळू शकेल.’