नवी दिल्ली : युवा सलामीवीर मुंबईकर पृथ्वी शॉ व आंध्रप्रदेशचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज हनुमा विहारी यांची इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी निवडकर्त्यांनी खराब फॉर्मशी झगडत असलेला सलामीवीर मुरली विजय व ‘चायनामन’ कुलदीप यादव यांना संघाबाहेर बसविले.
अनुभवी सलामीवीर मुरली विजय याला पहिल्या दोन कसोटीतील खराब खेळानंतर संघातून बाहेर करण्यात आले. तर चायनामन कुलदीप यादव याच्या जागी अतिरिक्त फलंदाजाला स्थान मिळाले आहे. इंग्लंडच्या वेगवान खेळपट्ट्यांवर तिसऱ्या फिरकीपटूची गरज नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे नेतृत्त्व केलेल्या पृथ्वीने देशांतर्गत स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली. दुसरीकडे, हनुमा विहारीनेही यंदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप पाडली आहे. त्याने ६३ प्रथम श्रेणी सामन्यांत ५९.७० च्या सरासरीने धावा फटकावल्या आहेत. विशेष म्हणजे दोघेही सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्धच्या सामन्यात दोघांनीही शतक झळकावले होते.