चेन्नई : भारतात भारताविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवायचा झाल्यास पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यासह फिरकी गोलंदाजीचा यशस्वी सामना करावा लागेल, असे मत इंग्लंड संघाचे फलंदाजी सल्लागार जोनाथन ट्रॉट यांनी बुधवारी व्यक्त केले. इंग्लंडच्या सरावानंतर ट्रॉट यांनी पत्रकारांशी ऑनलाइन संवाद साधला.
भारतात भारताविरुद्ध धावा काढण्याचे मोठे आव्हान असेल. त्यावर तोडगा काढा, शिवाय दडपणाच्या स्थितीतही न डगमगता योजना आखून यशस्वी व्हा, असे मी प्रत्येक खेळाडूला सांगितले आहे. फिरटीपटूंपुढे उभे राहताना त्यांचे चेंडू सहजपणे खेळण्याची सवय करून घ्या. अलीकडे भारतीय संघाने आपल्या वेगवान माऱ्याच्या बळावरदेखील ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले होते. हा अनुभव ध्यानात ठेवून फिरकीला खेळताना वेगवान माऱ्यापुढे कशीही फटकेबाजी करू नये, असेही बजावले आहे. भारतीय वेगवान गोलंदाजांनी किती दमदार कामगिरी केली, हे अवघ्या क्रिकेटविश्वाने काही दिवसांआधीच अनुभवले. सर्वच वेगवान गोलंदाज प्रभावशाली असून अष्टपैलू आहेत हे विशेष. सध्या प्रत्येक संघाकडे अनेक वेगवान गोलंदाज आहेत. मात्र फिरकी आणि वेगवान माऱ्याचे आव्हान पेलण्यास सज्ज राहणार असल्याचे ट्रॉट यांनी सांगितले.
शुक्रवारी सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीआधी खेळाडूंना कोणता कानमंत्र दिला, असा प्रश्न करताच ट्रॉट म्हणाले,‘ प्रत्येक खेळाडूची भूमिका वेगळी असेल. काही खेळाडू पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले आहेत. काहीजण अनेकदा भारतीय उपखंडात खेळले आहेत. वेगळे खेळाडू वेगळा संदेश असला तरी भारतात यशस्वी होण्यासाठी एकच मूलमंत्र आहे, आणि तो म्हणजे पहिल्या डावात मोठ्या धावा काढा आणि हे करताना भारतीय फिरकी गोलंदाजांचा न घाबरता यशस्वी सामना करा.’
पहिल्या कसोटीआधी पोप इंग्लंड संघात
चेन्नई : मधल्या फळीतील फलंदाज ओली पोप याला भारताविरुद्ध पहिल्या कसोटीआधी विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी इंग्लंड संघात समाविष्ट करण्यात आले. २३ वर्षीय पोपला पाकिस्तानविरुद्ध गतवर्षी ॲागस्टमध्ये अखेरच्या कसोटीदरम्यान क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्याच्या खांद्याचे हाड सरकल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
रिहॅबिलिटेशनमधून जात असणारा पोप श्रीलंका दौऱ्यात संघासोबत गेला होता. मात्र, तो संघात समाविष्ट नव्हता. त्यामुळे इंग्लंड संघाचा सहकारी स्टाफसोबत रिहॅब आणि उपखंडातील वातावरणाशी त्याला स्वत:ला जुळवून घेण्यास मदत मिळाली.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘‘सरेचा फलंदाज ओली पोप याला भारत दौऱ्यासाठी इंग्लंड कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले आहे. ॲागस्ट २०२० मध्ये झालेल्या खांद्याच्या दुखापतीतून पोप पूर्णपणे सावरलेला आहे. तो निवडीसाठी उपलब्ध असल्याने इंग्लंडचे वैद्यकीय पथक समाधानी आहे.’’
पहिल्या कसोटीसाठी निवडल्यास तो पाचव्या अथवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल.