ओव्हल, भारत वि. इंग्लंड कसोटीः इंग्लंडचा माजी कर्णधार आणि यशस्वी सलामीवीरांपैकी एक असलेल्या अॅलिस्टर कुकने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताविरुद्धचा पाचवा सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना आहे. त्यामुळे निरोपाच्या सामन्यात मोठी खेळी साकारण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मात्र, मालिका गमावल्यानंतर उरलेली इभ्रत वाचवण्यासाठी विराट कोहलीचा संघ प्रयत्नशील असणार आहे. पण, तसे करणे विराट सेनेसाठी सोपी गोष्ट नसणार आहे.
या मालिकेत कुकला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. मात्र, ओव्हल मैदानावरील कुकच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास भारतीय संघाला त्याला रोखणे अवघड गोष्ट असेल. ओव्हलवर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये कुक तिसऱ्या स्थानावर आहे आणि दुसऱ्या स्थानी झेप घेण्यासाठी त्याला केवळ 99 धावांची आवश्यकता आहे. ओव्हल मैदानावर हजार धावा करण्याचा मान पटकावण्यासाठी त्याला अवघी एक धाव हवी आहे.
इंग्लंडचे सर लिओनार्ड हटन 1521 धावांसह अव्वल स्थानी आहेत. त्यापाठोपाठ ग्रॅहम गूच 1097 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गूच यांना पिछाडीवर टाकण्यासाठी कुकला 99 धावांची गरज आहे. त्याशिवाय कुकला येथे तिसरे शतक झळकावेल का, याचीही उत्सुकता लागली आहे.