ओव्हल, भारत वि. इंग्लंड कसोटी: इंग्लंड कसोटी मालिकेत इभ्रत वाचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय संघाने पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी केली. मात्र, पहिल्या दिवशी भारताचा सलामीवीर शिखर धवन भाव खाऊन गेला. संपूर्ण मालिकेत साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या धवनने खेळ सुरु असताना असे कृत्य केले की सोशल मीडियावर पुन्हा त्याचीच चर्चा रंगली.
ॲलिस्टर कूक (71) आणि मोईन अली ( 50) यांच्या उपयुक्त खेळीनंतरही इंग्लंडचे ७ फलंदाज अवघ्या १९८ धावांवर माघारी परतले. कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळणाऱ्या कुकने साजेसा खेळ केला. जस्प्रीत बुमराने त्याला बाद केले आणि इंग्लंडच्या डावाची पडझड सुरू झाली. मजबूत स्थितीत असलेले यजमान बॅकफूटवर गेले. याचा आनंद धवनने वेगळ्या शैलीत साजरा केला.
दिवसाच्या अखेरच्या षटकांत सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या धवनने चक्क भांगडा नृत्य केले. भारतीय संघाचे पाठीराखे भारत आर्मीचे सदस्यही धवनच्या नृत्यात स्टेडियमवरून सहभागी झाले. या नृत्यानंतर धवन सोशल मीडियावर ट्रोल झाला.
View this post on Instagram
धवनचे नृत्य पाहून समालोचकांनीही भांगडा केला. भारताचा कसोटीपटू हरभजन सिंग याने सहकारी समालोचकांना भांगड्याचे प्रशिक्षण दिले.