Join us  

११२ वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला गेला, टीम इंडियाच्या नावावर हा पराक्रम झाला

भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध ४-१ असा विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 2:12 PM

Open in App

India vs England 5th Test Live update (  Marathi News  ) : भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध ४-१ असा विजय मिळवला. धरमशाला येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा निकाल लागला. १००वी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विनने ( R Ashwin ) डावात पाच विकेट्स घेऊन ऐतिहासिक कामगिरी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. टीम इंडियाने मालिका ४-१ ने जिंकली आणि पहिली कसोटी गमावल्यानंतरही या फरकाने मालिका जिंकणारा ११२ वर्षांच्या इतिहासातील हा पहिला संघ  ठरला. 

कुलदीप यादव ( ५-७२)  व अश्विन ( ४-५१) यांनी इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर गुंडाळला. त्यानंतर रोहित शर्मा ( १०३) , शुबमन गिल ( ११०) यांची शतकं आणि यशस्वी जैस्वाल ( ५७), सर्फराज खान ( ५६) व देवदत्त पड्डिकल ( ६५) यांच्या अर्धशतकांनी इंग्लंडला झोडले. कुलदीप यादव ( ३०) व जसप्रीत बुमराह ( २०) यांनी नवव्या विकेटसाठी ४९ धावा जोडून इंग्लंडची डोकेदुखी वाढवली. भारताने पहिल्या डावात  ४७७ धावा केल्या आणि २५९ धावांची आघाडी घेतली. 

दुसऱ्या डावात आर अश्विनने ( ५-७७) पाच विकेट्स घेतल्या. शंभराव्या कसोटीत ९ विकेट्स घेणारा तो मुथय्या मुरलीधरननंतर दुसरा गोलंदाज ठरला. इंग्लंडकडून जो रूट अर्धशतकी खेळी करून एकटा भिडला. इंग्लंडचा दुसरा डाव १९५ धावांवर गडगडला आणि भारताने एक डाव व ६४ धावांनी सामना जिंकला. जो रूट ८४ धावांवर बाद झाला.   इंग्लंड संघाने शेवटच्या वेळी ऑस्ट्रेलियन भूमीवर हा पराक्रम १९१२ मध्ये केला होता आणि ॲशेस मालिका जिंकली होती. आत्तापर्यंत असे फक्त तीन वेळा घडले आहे जेव्हा मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असतानाही संघांनी अखेरीस ४-१ ने मालिका जिंकली आहे. इंग्लंडने १९१२ मध्ये हे केले. ऑस्ट्रेलियाने १८९७/९८ आणि १९०१/०२ मध्ये इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. 

पहिली कसोटी गमावल्यानंतर टीम इंडियाने मालिका जिंकण्याची ही सातवी वेळ असेल. याआधी संघाने १९७२/७३ मध्ये इंग्लंडला घरच्या मैदानावर पराभूत केले होते. टीम इंडियाने २००१ मध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध, २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध, २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि त्यानंतर २०२०/२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि २०२१ मध्ये घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला होता.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धारोहित शर्मा