ओव्हल, भारत वि. इंग्लंड कसोटी: भारताचा कर्णधार विराट कोहलीप्रमाणे इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनही या कसोटी मालिकेत एकेक विक्रम नावावर करत आहे. पाचव्या व अंतिम कसोटीत इंग्लंडच्या या जलदगती गोलंदाजाने भारताचे दोन महत्त्वाचे फलंदाज बाद केले. या दोन विकेटसह त्याने श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे सर्वाधिक फलंदाज बाद करण्याचा विक्रम अँडरसनने नावावर केला.
भारतीय संघाची सुरुवात पुन्हा निराशाजनक झाली. शिखर धवन पुन्हा अपयशी ठरला. स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर तो अवघ्या तीन धावांवर माघारी परतला. त्यानंतर लोकेश राहुल व चेतेश्वर पुजारा यांनी ६४ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. मात्र सॅम कुरनच्या अप्रतिम चेंडूने राहुलला बाद केले. जेम्स अँडरसनने विराट कोहलीला जवळपास बाद केलेच होते, परंतु कुमार धर्मसेनाने इंग्लंड संघाची अपील फेटाळली. मात्र अँडरसनने ही कसर भारताच्या दोन फलंदाजांना बाद करून भरून काढली. अँडरसनने पुजारा व अजिंक्य रहाणे यांना एकाच षटकात माघारी पाठवले.
या दोन विकेटसह अँडरसनने भारताच्या सर्वाधिक फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम नावावर केला. त्याने १०७ भारतीय खेळाडूंना बाद केले आहे. या मालिकेत त्याने २१ विकेट घेतल्या आहेत. मुरलीधरनने १०५ भारतीय खेळाडूंना बाद केले होते. जलद गोलंदाजात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही अँडरसनला खुणावत आहे. ग्लेन मॅक्ग्राचा ५६३ विकेटच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी अंडरसनला २ विकेटची आवश्यकता आहे.