ओव्हल, भारत वि. इंग्लंड कसोटीः भारताच्या हनुमा विहारीने कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावण्याच पराक्रम केला. त्याने 124 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार आणि 1 षटकार खेचून 56 धावांची खेळी साकारली. पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो भारताचा 26वा खेळाडू ठरला. याव्यतिरिक्त त्याने रवींद्र जडेजासोबत सातव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करून 82 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
6 बाद 174 धावसंख्येवरून तिसरा दिवसाच्या खेळाची सुरुवात करताना विहारी आणि जडेजा यांनी भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले. दोघांनी संयमी खेळ करताना संघाला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला. विहारीने अर्धशतकी खेळी करून संघातील निवड सार्थ ठरवली. 56 धावांवर असताना मोईन अलीने त्याला बाद केले. 1974मध्ये पार्थसार्थी शर्मा यांनी पदार्पणात केलेल्या 54 धावांना मागे टाकण्याच पराक्रम विहारीने केला. इंग्लंडमधील भारतीयाने पदार्पणात केलेली ही चौथी सर्वोत्तम खेळी ठरली.
विहारी बाद होताच सातव्या विकेटसाठीची जडेजासोबतची 77 धावांची भागीदारीही संपुष्टात आली. इंग्लंडविरुद्ध सातव्या विकेटसाठी भारतीय खेळाडूंनी केलेली ही 8 वी सर्वोत्तम भागीदारी ठरली. विहारी आणि जडेजा या जोडीने 82 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला. सी के नायडू आणि सी रामास्वामी यांनी 1936 साली इंग्लंडविरुद्ध सातव्या विकेटसाठी 73 धावा जोडल्या होत्या आणि तो विक्रम रविवारी विहारी व जडेजा या जोडीने मोडला.
त्यानंतर जडेजाने सुत्र आपल्या हाती घेतली. उपहारापर्यंत भारताने 7 बाद 240 धावा केल्या.