IND vs ENG, , 5th T20I Mohammed Shami Takes A Wicket In International Cricket After 441 Days : इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत कॅबकचा दुसरा टी-२० सामना खेळणाऱ्या मोहम्मद शमीला अखेर विकेट मिळाली आहे. १९ नोव्हेंबर २०२३ मधील वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर इंग्लंड विरुद्धच्या २८ जानेवारी २०२५ रोजी झालेला राजकोटच्या मैदानात त्याने पहिला आंतरारष्ट्रीय सामना खेळला. पण या सामन्यात ३ षटके टाकून विकेट लेस राहिल्यावर त्याला पुन्हा बाकावर बसवण्यात आले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अखेर शमीला विकेट मिळाली, बेन डकेटच्या पदरी भोपळा
इंग्लंड विरुद्धची वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी त्याला पुन्हा टी-२० संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. या सामन्यातील पहिल्या षटकात सॉल्टनं त्याची धुलाई केली. पण दुसऱ्या षटकात कमबॅक करत त्याने कमबॅकमधील पहिली विकेट आपल्या खात्यात जमा केली. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटला त्याने शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला.
पहिल्या षटकात धुलाई, सॉल्टनं चौकार-षटकारानं केलं होत स्वागत
कमबॅकचा दुसरा सामना खेळणाऱ्या मोहम्मद शमीनं वानखेडेच्या मैदानात भारताच्या डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्टनं त्याच्याविरुद्ध आक्रमक फटकेबाजी केली. पहिल्या दोन चेंडूवर चौकार मारल्यावर शमीच्या तिसऱ्या चेंडूवर सॉल्टनं षटकार मारला. या षटकात मोहम्मद शमीनं १७ धावा खर्च केल्या. पण पुढच्या षटकातच त्याने विकेट्स घेत आपल्या खात्यात अखेर विकेट जमा केली. त्याने इंग्लंडची सलामी जोडी फोडत टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले.
दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विकेट, तिसऱ्या षटकात तीन चेंडूत साधला २ विकेट्सचा डाव
पहिल्या षटकात सॉल्टनं केलेल्या धुलाईचा वचपा काढताना मोहम्मद शमीनं बेन डकेटची शिकार केली. बेन डकेट शमीच्या चेंडूवर ऑफ साइडच्या दिशेन फटका खेळायला गेला अन् तो जाळ्यात अडकला. शतकवीर अभिषेक शर्मानं त्याचा एक सोपा झेल टिपला. भारतीय संघानं उभारलेल्या २४८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ गडबडला. ११ व्या षटकात शमी या सामन्यातील आपलं शेवटचं षटक घेऊन आला त्यावेळी बॅकफूटवर असलेल्या इंग्लंडच्या संघाच्या हातात शेवटच्या दोन विकेट्स उरल्या होत्या. शमीनं पहिल्या चेंडूवर एक धाव दिली. त्यानंतर दोन चेंडूत दोन विकेट्स घेत शमीनं इंग्लंडचा डाव आटोपला. तो या सामन्यात टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. इंग्लंड विरुद्धची वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी शमीसह टीम इंडियासाठी हे 'अच्छे दिन' चे संकेतच आहेत.