India vs England 5th T20I Abhishek Sharma Century : अभिषेक शर्मानं इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात दमदार शतक झळकावले आहेत. चौकार-षटकारांची बरसात करत अभिषेक शर्मानं ३७ चेंडूत शतक साजरे केले. आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत त्याच्या भात्यातून आलेले हे दुसरे शतक आहे. टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक आहे. सर्वात जलदगतीने शतकी खेळी करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावे आहे. त्याने २०१७ मध्ये इंदूरच्या मैदानात श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत ३५ चेंडूत शतक झळकावले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अभिषेकनं मोडला संजू सॅमसनचा रेकॉर्ड
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये दुसऱ्या सर्वात जलद शतकी खेळीचा रेकॉर्ड आधी संजू सॅमसनच्या नावे होता. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर बांगालदेशविरुद्धच्या लढतीत संजू सॅमसन याने ४० चेंडूत शतक झळकावले होते. हा विक्रम अभिषेक शर्मानं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मोडित काढला. त्याने ३७ चेंडूत शतकाला गवसणी घातली.
शतकी खेळी आधी साधला दुसऱ्या जलद अर्धशतकी खेळीचा डाव
इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्मानं सुरुवातीपासून आक्रमक अंदाजात बॅटिंग केली. शतकी खेळीआधी अभिषेक शर्माने भारताकडून दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावे केला. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. भारताकडून सर्वात जलदग अर्धशतक झळकावण्याचा विक्रम हा युवराज सिंगच्या नावे आहे. त्याने २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक साजरे केले होते. गुरु पाठोपाठ आता या यादीत युवीचा चेला अभिषेकचा नंबर लागतो. हा रेकॉर्ड सेट करताना अभिषेक शर्मानं लोकेश राहुलचा विक्रम मोडीत काढला. लोकेश राहुलनं स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात १८ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.