ठळक मुद्देसाऊदम्पटन येथे भारतीय संघ दुसऱ्यांदा कसोटी सामना खेळणार आहे. 2014 मध्ये इंग्लंडने भारतावर येथे 266 धावांनी विजय मिळवला होता.
साऊदम्पटनः कर्णधार विराट कोहलीने 38 कसोटी सामन्यांत कायम राखलेली परंपरा इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटीत खंडित होण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंड यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला आजपासून साऊदम्पटन येथे सुरुवात होत आहे. या कसोटीत खेळण्यासाठी फिरकीपटू आर. अश्विन तंदुरुस्त असल्याचे विराटने जाहीर करताच त्याची परंपरा खंडित होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कसोटीत पहिल्यांदाच विराट एक संघ कायम ठेऊन मैदानावर उतरणार आहे.
सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला,' चौथ्या कसोटीत खेळण्यासाठी सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत. अश्विन पण फिट आहे. त्याने काल कसून सराव केला. ठरवून सतत संघात बदल केलेले नाही. अनेकवेळा दुखापतींमुळे संघात बदल करावे लागले. पण, आता तशी शक्यता कमी आहे आणि त्यामुळे चौथ्या सामन्यात संघात बदल करणे गरजेचे वाटत नाही.'
भारतीय संघाने 0-2 अशा पिछाडीवरून कमबॅक करताना नॉटिंगहॅम कसोटीत 203 धावांनी विजय मिळवून मालिकेतील आव्हान कायम राखले होते. त्यामुळे या विजयी संघच चौथ्या कसोटीत कायम राखणार असल्याचे संकेत विराटने दिले. तो म्हणाला,'मालिकेत योग्य वेळी आम्हाला लय सापडली आहे. 0-2 अशा पिछाडीवर असतानाही कमबॅक करणे, ही मोठी गोष्ट आहे. इंग्लंड निर्भेळ यश मिळवेल असे सर्वांना वाटले होते, परंतु आम्ही त्यांना चुकीचे ठरवले. आता चौथ्या कसोटीत उंचावलेल्या मनोबलाने आम्ही मैदानावर उतरणार आहोत.'
साऊदम्पटन येथे भारतीय संघ दुसऱ्यांदा कसोटी सामना खेळणार आहे. 2014 मध्ये इंग्लंडने भारतावर येथे 266 धावांनी विजय मिळवला होता.