India vs England 4th Test Live Update Marathi News : भारत-इंग्लंड यांच्यातला चौथा कसोटी सामना रांची येथे खेळवला जात आहे. दोन सामन्यानंतर इंग्लंडने आज नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात २७ वर्षीय गोलंदाज आकाश दीप ( Akash Deep) याचे पदार्पण झाले. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या हस्ते त्याला टेस्ट कॅप दिली गेली. त्याने भन्नाट गोलंदाजीने इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉली याचा त्रिफळा उडवला आणि जोरदार सेलिब्रेशन झाले. पण, अम्पायरने क्रॉलीला थांबण्यास सांगितले अन्...
रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल यांच्यानंतर या मालिकेत पदार्पण करणारा आकाश हा चौथा युवा खेळाडू ठरला आहे. याचाही टीम इंडियापर्यंतचा प्रवास संघर्षमयी आहे. त्याच्या वडिलांचा क्रिकेटला विरोध होता, परंतु त्यानंतरही तो आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत राहिला आणि आज त्याला यश मिळाले. पण, भारताकडून पदार्पण होताना पाहायला त्याचे वडील हयात नाहीत. आकाशने पहिल्याच कसोटीत प्रभावी मारा केला. क्रॉलीचा त्रिफळा त्याने उडवला होता, परंतु त्याचा पाय क्रिजच्या थोडा पुढे गेल्याने No Ball राहिला आणि क्रॉली वाचला. कसोटीची पहिलीच विकेट नो बॉलमुळे नाकारली जाणारा हा पहिला गोलंदाज नाही. यापूर्वी लसिथ मलिंगा, मिचेल बीअर, बेन स्टोक्स, मार्क वूड, स्टुअर्ट बिन्नी, टॉम कुरन यांच्यासोबतची असे घडले होते.
पण, आकाशने त्यानंतर एकाच षटकात बेन डकेट ( ११) व ऑली पोप ( ०) यांना माघारी पाठवून इंग्लंडला ४७ धावांवर दोन धक्के दिले.