भारत-इंग्लंड यांच्यातील पुण्याच्या मैदानात सुरु असलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात हार्दिक पांड्यानं तुफान फटकेबाजी नजराणा पेश केला. भारतीय संघ अडचणीत असताना सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन त्याने २७ चेंडूत अर्धशतक साजरे केले. आपल्या कडक खेळीत हार्दिक पांड्यानं भारतीय संघाला दुसऱ्या ओव्हरमध्ये तीन धक्के देणाऱ्या साकिब महमूदचीही चांगलीच जिरवली. १६ व्या षटकात पांड्याने त्याच्या गोलंदाजीवर दोन उत्तुंग षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. संघाचा डाव सावरताना हार्दिक पांड्याने ३० चेंडूत ५३ धावा करताना ४ चौकार आणि ४ षटकार ठोकले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुणेकरांसाठी पांड्यानं पेश केला नो लूक शॉटचा खास नजराणा
हार्दिक पांड्याने डाव सावरणारी जबरदस्त खेळी करताना आपल्या भात्यातून जी फटकेबाजी केली ती अक्षरश: डोळ्याच पारणं फेडणारी होती. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना हार्दिकनं सुपर सिक्स मारल्याचे पाहायला मिळाले. नो लूक स्टाइलची झलक दाखवून देत त्याने षटकार मारत अर्धशतकाला गवसणी घातली. हाच तोरा कायम ठेवण्याच्या नादात त्याने विकेट फेकली. पण त्याआधी त्याने आपली भूमिका अगदी चोख बजावली होती.
हार्दिक पांड्याचा पुढेही असाच तोरा दिसावा हीच अपेक्षा
हार्दिक पांड्यानं सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन शिवम दुबेच्या साथीनं ८७ धावांची भागीदारी रचली. त्याने केलेल्या फटकेबाजीमुळे इंग्लंडच्या गोलंदाजांचे खांदे पडले अन् टीम इंडियाची रुळावरुन घसरलेली गाडी पटरीवर धावू लागली. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात हार्दिक पांड्यावर ट्रोल होण्याची वेळ आली होती. अखेरच्या षटकात धावांचा पाठलाग करताना त्याला फटकेबाजी जमली नाही, असेही बोलले गेले. पण आता चौथ्या सामन्यात दबावात दमदार खेळी करून दाखवत पांड्यानं आपला स्वॅग दाखवून दिला आहे. हार्दिक पांड्या हा आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या ताफ्यातील महत्त्वाचा खेळाडू आहे. या मोठ्या स्पर्धेआधी पांड्याचे पाहायला मिळाले तेवर टीम इंडियासाठी आनंदी आनंद गडे हे गाणं वाजवायला लावणारे आहे. त्याचा हाच तोरा इंग्लंड विरुद्धच्या वनडेसह आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीत दिसावा हीच अपेक्षा.
Web Title: India vs England 4th T20I Hardik Pandya Fifty He Blast Against Saqib Mahmood Hit 2 six See Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.