मुंबई- ऋषभ पंतच्या कसोटी कारकिर्दीची यापेक्षा चांगली सुरूवात होऊच शकत नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ट्रेंट ब्रिज येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत यष्टिरक्षक पंतने अनेक विक्रम नोंदवले. पहिल्याच सामन्यात पाच झेल टिपणारा तो पहिला भारतीय तर एकूण तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. यासह त्याने ४० वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली.
आदिल रशीदच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचणाऱ्या पंतची सोशल मीडियावर चर्चा रंगली. त्याने ५१ चेंडूंत २४ धावा केल्या. भारताचा पहिला डाव ३२९ धावांत आटोपला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या सत्रात इंग्लंडच्या नऊ फलंदाजाना बाद केले. त्यापैकी पाच झेल यष्टिमागे पंतने टिपले. त्यात ॲलेस्टर कुक, किटन जेनिंग, ऑली पोप, ख्रिस वोक्स आणि आदील रशीद यांचा समावेश आहे.
या पराक्रमानंतर कसोटी पदार्पणात पाच झेल टिपणारा तो पहिला भारतीय ठरला. ऑस्ट्रेलियाच्या ब्रायन टॅबर ( १९६६ ) आणि जॉन मॅक्लीन ( १९७८ ) यांनी पदार्पणात अशी कामगिरी केली होती. आंतरराष्ट्रीय सामन्यात एका डावात पाच झेल घेणाऱ्या युवा खेळाडूचा मानही पंतने ( २० वर्षे व ३१९ दिवस ) मिळवला. त्याने इंग्लंडच्या ख्रिस रीड ( २० वर्षे व ३२५ दिवस ) यांनी १९९९ साली न्यूझीलंडविरुद्ध नोंदवलेला विक्रम मोडला.
त्याआधी पंतने चार झेल टिपून ६३ वर्षापूर्वी भारताच्या एनएस ताम्हाणे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. ताम्हाणे यांनी १९५५ साली पाकिस्तानविरूद्ध पदार्पणात चार झेल घेतले होते. सीटी पाटणकर यांनी त्याच वर्षी न्यूझीलंडविरुद्ध हा पराक्रम केला होता, तर पी जी जोशी हे अशी कामगिरी करणारे (१९५१ इंग्लंडविरूद्ध) पहिले भारतीय होते.