नॉटिंघम : तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताच्या नावे राहिला. विराट कोहली (९७) आणि अजिंक्य रहाणे (८१) यांच्या खेळीच्या जोरावर भारताने दिवसाअखेर ८७ षटकांत ६ बाद ३०७ धावा केल्या आहेत.
तिसºया कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला. या सामन्यात भारताने संघात तीन बदल केले. विजयऐवजी धवनला संधी देण्यात आली. कुलदीप यादवला वगळून जसप्रीत बुमराह याला संधी मिळाली आणि रिषभ पंत याने कसोटी पर्दापण केले.
सुरुवातीला इंग्लंडच्या गोलंदाजांना सलामीवीर शिखर धवन आणि के.एल. राहुल यांनी चांगलेच हैराण केले. धवन याने ६५ चेंडूत ३५ धावा केल्या. तर राहुलही २३ धावा करून बाद झाला. पुजाराही (१४) उपहाराच्या आधी बाद झाला. पण अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरला.
ख्रिस व्होक्स याने धवन, पुजारा, राहुलला तंबूत पाठवले. तर स्टुअर्ट ब्रॉड याने रहाणेला बाद केले. रहाणे याने ८१ धावा केल्या. तर विराट कोहली याने १५२ चेंडूत ११ चौकारांसह ९७ धावांची खेळी केली. आदिल राशिद याने त्याला बाद केले. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या युवा रिषभ पंत याने बेन स्टोंक्सला षटकार लगावला. षटकारावर कसोटीतील धावांचे खाते उघडणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. युवा रिषभ याने हार्दिक पांड्याच्या साथीने जबाबदारीने खेळ केला. मात्र फटके मारतानाही स्वत:ला आवरले नाही. हार्दिक पांड्याला जेम्स अँडरसनने बाद केले. त्यासोबतच भारताविरोधात कसोटीत १०० बळी घेणारा अँडरसन दुसरा गोलंदाज ठरला. पांड्या बाद झाल्यावर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी रिषभ पंत २२ धावांवर खेळत होता.