India vs England 3rd Test Live Updates Day 3 - फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर इंग्लंडकडूनही सडेतोड उत्तर मिळाले. भारताच्या पहिल्या डावाच्या ४४५ धावांच्या प्रत्युत्तरात सलामीवीर बेन डकेटने वेगवान शतक झळकावले. इंग्लंडच्या फलंदाजांनी बॅझबॉल खेळ कायम राखताना साडेसहाच्या सरासरीने धावा कुटल्या आणि दिवसअखेर २ बाद २०७ धावांपर्यंत मजल मारली. झॅक क्रॉली ( १५) याची विकेट घेऊन अश्विनने कसोटीत ५०० वी विकेट पूर्ण केली. अनिल कुंबळे यांच्यानंतर असा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. डकेट व ऑली पोप ( ३९) यांनी भारतीय संघाची झोप उडवताना ९३ धावांची भागीदारी केली. इंग्लंडने ३५ षटकांत २ बाद २०७ धावांवर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपवला.
पण, आर अश्विनला कौटुंबिक कारणामुळे अचानक तिसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली. भारतीय संघाने १० प्रमुख व १ राखीव खेळाडूंसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आर अश्विनची रिप्लेसमेंट झालेली नाही. देवदत्त पडिक्कल अश्विनला रिप्लेसमेंट म्हणून संघात खेळतोय. आज भारतीय खेळाडू दंडावर काळी फित घालून मैदानावर उतरले. काही दिवसांपूर्वी भारताचे वयस्कर क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन झाले होते आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून आज खेळाडूंनी काळी फित बांधली.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड (डीके) यांचे सोमावारी वयाच्या ९५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे ते वडील होते. दत्ताजीराव यांनी ११ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. भारताच्या १९५९ सालच्या इंग्लंड दौऱ्यावर त्यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी होती. दत्ताजीराव गायकवाड हे भारताचे सर्वात वयस्कर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते.
१९५२ ते १९६१ या कालावधीत त्यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले होते. उत्तम बचाव आणि नेत्रदिपक फटके मारण्यात त्यांचा हातखंडा होता. मात्र, त्यांना भारतीय संघाच्या मधल्या फळीत फार जम बसवता आला नाही. १९५२ मध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध सलामीवीर म्हणून पदार्पण केले. मधल्या फळीत जेव्हा त्यांना संधी मिळाली, तेव्हा त्यांनी उपयुक्तता दाखवून दिली होती. १९५३ चा वेस्ट इंडिज आणि १९५९च्या इंग्लंड दौऱ्यावर त्यांना संधी मिळाली. पाकिस्तानविरुद्ध १९५२-५३ व वेस्ट इंडिजविरुद्ध १९५८-५९च्या घरच्या मैदानावरील मालिकेतही ते खेळले. १९५९ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर खेळला, परंतु त्यात पाचही कसोटी भारताने गमावल्या होत्या.