india vs England 2021 3rd test match live cricket score : टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ७८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनं ४३२ धावा घेताना ३५४ धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय फलंदाजांची पहिल्या डावातील हाराकिरी लक्षात घेता, दुसऱ्या डावात त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागेल हे निश्चित आहे. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक चार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. या सामन्यात रिषभ पंतला क्षेत्ररक्षण करताना मैदानावरील अम्पायर्सनी ताकीद दिली. 
दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात अॅलेक्स वॉर्फ व रिचर्ड केटलबोरॉग यांनी पंतला त्याच्या ग्लोव्हजवरील टेप काढण्यास सांगितले. पंतनं चौथ्या व पाच्या बोटाला टेप लावली होती आणि MCCच्या नियमानुसार हे चुकीचे आहे. नियम क्रमांक २७.२ नुसार मधलं बोट अन् अंगठा याच्याशिवाय कोणत्याही बोटांना टेप लावणे चुकीचे आहे.
डेविड मलानचा झेल पंतनं टिपल्यानंतर अम्पायर त्याच्यापाशी गेले अन् त्याला ग्लोव्हजला लावलेली टेप काढायला सांगितले.   
इंग्लंडनं सलामीला उतरवलेली हसीब हमीद ( ६८) आणि रोरी बर्न्स  ( ६१) ही नवी जोडीनं १३५ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार जो रूट पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर अभेद्य भिंतीसारखा उभा राहिला. रूट व मालिकेत पहिलाच सामना खेळणाऱ्या डेविड मलान यांनी १३९ धावांची भागीदारी केली. मलान १२८ चेंडूंत ११ चौकारांसह ७० धावांवर माघारी परतला. ind vs eng 3rd test live scoreboard, ind vs eng 3rd test 
जसप्रीत बुमराहनं इंग्लंडच्या कर्णधाराचा झंझावात रोखला. बुमराहच्या चेंडूचा अंदाज घेण्यात यावेळी रूट चूकला अन् १६५ चेंडूंत १४ चौकारांसह १२१ धावा करून तो माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजानं मोईन अलीची ( २९) विकेट घेतली. इंग्लंडनं दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ४२३ धावा करताना पहिल्या डावात ३४५ धावांची आघाडी घेतली होती. 
इंग्लंडनं कसोटीत भारताविरुद्ध पहिल्या डावात घेतलेली ही चौथी मोठी खेळी आहे.  यापूर्वी २०११मध्ये एडबस्टन कसोटीत ४८६ धावा, १९८४/८५मध्ये चेन्नई कसोटीत ३८० व १९६७ मध्ये लीड्स कसोटीत ३८६ धावांची आघाडी घेत इंग्लंडनं विजय मिळवला होता. फक्त १९३८साली ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या कसोटीत ३६८ धावांची आघाडी घेऊनही इंग्लंडला ड्रॉ निकालावर समाधान मानावे लागले होते.