नॉटिगहॅम : हार्दिक पांड्याने (५/२८) केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने तिसºया कसोटीच्या दुसºया दिवशी यजमान इंग्लंडचा पहिला डाव १६१ धावांत गुंडाळून १६८ धावांची भक्कम आघाडी घेतली. हार्दिकने टिच्चून मारा करत इंग्लंडला जखडवून ठेवले. इंग्लंडकडून जोस बटलर याने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. यानंतर भारताने दुसºया डावात दमदार फलंदाजी करत दिवसअखेर २ बाद १२४ धावा केल्या. भारतीय संघ आता २९२ धावांनी आघाडीवर असून चेतेश्वर पुजारा (३३*) व कर्णधार विराट कोहली (८*) खेळत आहेत.
ट्रेंट ब्रीज मैदानावर भारताचा पहिला डाव ३२९ धावांत संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडचे फलंदाज भारतीय माºयापुढे अडखळले. अॅलिस्टर कूक - किटॉन जेनिंग्स यांनी ५४ धावांची अर्धशतकी सलामी देत इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली. यावेळी यजमान मोठी मजल मारत पुन्हा वर्चस्व गाजवणार असे दिसत होते. मात्र इशांतने कूकला बाद करुन ही जोडी फोडताच इंग्लंडच्या फलंदाजीला गळती लागली. कूक १२व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला, तर पुढच्याच चेंडूवर बुमराहने जेनिंग्सला माघारी धाडल्याने इंग्लंडची बिनबाद ५४ वरुन २ बाद ५४ अशी अवस्था झाली. यानंतर पुढील १०७ धावांत उर्वरीत फलंदाज बाद करत भारताने इंग्लंडला झटपट गुंडाळले.
भारतीयांनी नियंत्रित व अचूक टप्प्यावर मारा करत इंग्लंडला सतावले. मधल्या फळीतील जोस बटलर बाद होणारा अखेरचा फलंदाज ठरला. त्याने ३२ धावांत ३ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांची आक्रमक खेळी केल्याने इंग्लंडचा डाव काहीसा लांबला. याशिवाय कूक व जेनिंग्स या सलामीवीरांनी अनुक्रमे २९ व २० धावांची खेळी केली. हार्दिकने जबरदस्त मारा करताना ६ षटकांमध्ये २८ धावा देत ५ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्याला बुमराह (२/३७) आणि इशांत (२/३२) यांनी चांगली साथ दिली. मोहम्मद शमीनेही एक बळी मिळवला.
यानंतर दुसºया डावाची सुरुवात करताना शिखर धवन - लोकेश राहुल यांनी ६० धावांची सलामी देत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. परंतु, पुन्हा एकदा दोघांना चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात अपयश आले. राहुल ३३ चेंडूत ३६, तर धवन ६३ चेंडूत ४४ धावा करुन बाद झाला. यानंतर पुजारा व कोहली यांनी दिवसअखेरपर्यंत नाबाद राहत भारताला भक्कम स्थितीत आणले.
तत्पूर्वी, रविवारी सकाळी ६ बाद ३०७ धावांवरुन सुरुवात केलेल्या भारताचा डाव ३२९ धावांत संपुष्टात आला. यावेळी भारतीयांना अवघ्या २२ धावा काढता आल्या. कसोटी पदार्पण करणारा युवा रिषभ पंत केवळ २ धावांची भर काढून २४ धावांवर स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. यानंतर भारताचे उर्वरीत फलंदाज झटपट बाद झाले. जेम्स अँडरसन, ब्रॉड व ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी ३ बळी घेत भारताला रोखले.
धावफलक :
भारत (पहिला डाव) : ८७ षटकात ६ बाद ३०७ धावांवरुन पुढे... रिषभ पंत त्रि. गो. ब्रॉड २४, रविचंद्रन अश्विन त्रि. गो. ब्रॉड १४, इशांत शर्मा नाबाद १, मोहम्मद शमी झे. ब्रॉड गो. अँडरसन ३, जसप्रीत बुमराह त्रि. गो. अँडरसन ०. अवांतर - १९. एकूण : ९४.५ षटकात सर्वबाद ३२९ धावा. गोलंदाजी : अँडरसन ६४-३; ब्रॉड ७२-३; स्टोक्स ५४-०; वोक्स ७५-३; रशिद ४६-१.
इंग्लंड (पहिला डाव) : कूक झे. पंत गो. इशांत २९, जेनिंग्स झे. पंत गो. बुमराह २०, रुट झे. राहुल गो. हार्दिक १६, पोप झे. पंत गो. इशांत १०, बेयरस्टॉ झे. राहुल गो. हार्दिक १५, स्टोक्स झे. राहुल गो. शमी १०, बटलर झे. शार्दुल गो. बुमराह ३९, वोक्स झे. पंत गो. हार्दिक ८, रशिद झे. पंत गो. हार्दिक ५, ब्रॉड पायचीत गो. हार्दिक ०, अँडरसन नाबाद ०. अवांतर - ८. एकूण : ३८.२ षटकात सर्वबाद १६१ धावा. गोलंदाजी : शमी ५६-१; बुमराह ३७-२; अश्विन ३-०; शर्मा ३२-२; पांड्या २८-५.
भारत (दुसरा डाव) : धवन झे. बेयरस्टॉ गो. रशिद ४४, राहुल त्रि. गो. स्टोक्स ३६, पुजारा खेळत आहे ३३, कोहली खेळत आहे ८. अवांतर ३. एकूण : ३१ षटकात २ बाद १२४ धावा. गोलंदाजी : स्टोक्स १/३०; रशिद १/२३.