चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी विराट कोहली लयीत परतल्याचे पाहायला मिळाले. अहमदाबादच्या इंग्लंड विरुद्धच्या मैदानात त्याने दमदार खेळी केली. वनडे कारकिर्दीत त्याने ७३ वे अर्धशतक झळकावले. पण ही खेळी मोठी करण्यात तो अपयशी ठरला. यावेळी पुन्हा त्याच्या आडवा आला तो आदिल रशीद. भारताच्या स्टार फलंदाजाला पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात अडकवत आदिल राशीदनं खास विक्रम आपल्या नावे केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याने एन्ट्री मारली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुन्हा एकदा आदिल रशीदच्या गोलंदाजीवर फसला विराट
भारताच्या डावातील १९ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदनं किंग कोहलीला चकवा देत विकेट किपर करवी झेलबाद केले. याआधीच्या सामन्यातही विराट कोहलची विकेट याच फिरकीपटूनं घेतली होती. आता पुन्हा एकदा विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवत आदिल रशीदनं मोठा डाव साधला आहे. कोहलीनं दुसऱ्या वनडे सामन्यात ५५ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावांची खेळी केली.
११ व्या वेळी केली कोहलीची शिकार
विराट कोहलीची विकेट घेत आदिल रशीदनं दिग्गजांच्या पक्तींत स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीला सर्वाधिक ११ वेळा बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सामील झालाय. न्यूझीलंडच्या टिम साउदी आणि ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीला ११ वेळा बाद केले आहे. रशीदनं वनडे सामन्यात पाचव्यांदा कोहलीची विकेट घेतली आहे. याशिवाय कसोटीत ४ वेळा आणि टी-२० मध्ये दोन वेळा त्याने किंग कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज
१. टिम साउदी (न्यूझीलंड) - ३७ सामन्यांमध्ये ११ वेळा२. जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया) - २९ सामन्यांमध्ये ११ वेळा३. आदिल रशीद - (इंग्लंड) - ३४ सामन्यांमध्ये ११ वेळा४. मोईन अली (इंग्लंड) - ४१ सामन्यांमध्ये १० वेळा५. जेम्स अँडरसन (इंग्लंड) - ३७ सामन्यांमध्ये १० वेळा