Join us

खेळ तुमचा, रुबाब आमचा! भारतीय संघाने वनडे मालिका ३-० जिंकत इंग्रजांना टेकायला लावले गुडघे

भारतीय संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३४.२ षटकात अवघ्या २१४ धावांत आटोपला.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 20:48 IST

Open in App

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं दाबात विजय मिळवला. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला १४२ धावांनी पराभूत करताना भारतीय संघाने वनडेच्या आतपर्यंतच्या इतिहासातील दुसरा मोठा विजय नोंदवला आहे. एवढेच नाही तर इंग्लंडला ३-० असा शह देत भारतीय संघाने १२ व्या वेळी प्रतिस्पर्धी संघाला व्हाइट वॉश करण्याचा खास विक्रमही नोंदवला आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघानं निर्धारित ५० षटकात ३५६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३४.२ षटकात अवघ्या २१४ धावांत आटोपला.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

इंग्लंडचा ताफ्यातून एकही अर्धशतक आलं नाही, भारतीय गोलंदाजीत प्रत्येकानं घेतली विकेट 

भारतीय संघाने ठेवलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामी जोडीनं धमाकेदार सुरुवात केली. पण अर्धशतकी खेळीनंतर ही जोडी फुटली अन् इंग्लंडच्या विकेट्सची रांग लागली. भारतीय संघाने  ठराविक अंतराने इंग्लंडला धक्क्यावर धक्के देत आपला दबदबा कायम ठेवला. टॉम बेंथॉन ३८ (४१) आणि गस ॲटकिन्सन ३८ (१९) या दोघांनी संघाकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली.  इंग्लंडच्या ताफ्यातील एकालाही अर्धशतकही करता आले नाही. परिणामी इंग्लंडचा डाव ३५ व्या षटकातच २१४ धावांवर आटोपला. भारताकडून अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदरनंही एक एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.

शुबमनच्या शतकाशिवाय या तिघांनी दाखवला बॅटिंगमधील जलवा

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने प्रत्येक सामन्यात टॉस जिंकली, पण मॅच मात्र भारतीय संघानेच बाजी मारली. पहिल्या दोन सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग घेऊन फसल्यावर तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात बटलरनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्माच्या रुपात भारतीय संघाला अवघ्या ६ धावांवर पहिला धक्का बसला. पण त्यानंतर शुबमन गिल ११२ (१०२),  विराट कोहली ५२ (५५) आणि श्रेयस अय्यर ७८ (६४) यांच्यासह लोकेस राहुलनं २९ चेंडूत ४० धावा केल्या. या चौघडीच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघानं निर्धारित ५० षटकात ३५६ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून बॉलिंगमध्ये आदिल रशीदनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माजोस बटलर