Join us  

धोनी किती पुढचा विचार करतो बघा!... पंचांकडून चेंडू घेण्याचं 'हे' होतं कारण

जे काम भारताचा कर्णधार म्हणून विराट कोहलीने करायला हवे होते, ते काम धोनी करताना दिसत आहे. यावरूनच धोनीची किती चांगले नेतृत्त्व करू शकतो, याची प्रचिती येऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 1:50 PM

Open in App
ठळक मुद्देधोनीने पंचांकडून चेंडू मागून घेतला त्यावेळी धोनी आता एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

लंडन : एखादा सामना जिंकला की त्याची आठवण म्हणून खेळाडू मैदानातील स्टम्प किंवा बॉल आपल्याजवळ ठेवत असतात. पण इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यावर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पंचांकडून चेंडू मागून घेतला. त्यावेळी धोनी आता एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण त्याने हा चेंडू का घेतला याचा खुलासा दस्तुरखुद्द धोनीनेच केला आहे.

एक कर्णधार म्हणून धोनी किती चाणाक्ष होता, हे साऱ्यांनाच माहिती आहे. पण सध्याच्या घडीला तो भारताचा कर्णधार नाही, पण तरीदेखील तो संघासाठी फार पुढचा विचार करताना दिसतो. धोनीने एकदिवसीय मालिका संपल्यावर पंचांकडून चेंडू मागून घेतला, कारण आगामी विश्वचषक हा इंग्लंडमध्येच खेळण्यात येणार आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये चेंडू कसा रिव्हर्स स्विंग करता येईल, हा विचार करून त्याने त्यावेळी चेंडू घेतला होता. यावरून महेंद्रसिंग धोनीचा दृष्टीकोन समजून येतो.

याबाबत धोनी म्हणाला की, " इंग्लंडच्या गोलंदाजांना एकदिवसीय मालिकेत चांगला रिव्हर्स स्विंग मिळत होता. त्यामुळे आम्हाला जर रिव्हर्स स्विंग करायचा असेल तर काय करावे लागेल, यासाठी मी पंचांकडून त्यावेळी चेंडू मागून घेतला होता. "

धोनी फक्त पंचांकडून चेंडू घेऊन थांबला नाही, तर त्याने हा चेंडू संघातील प्रशिक्षकांना दिला आणि चेंडूवर रिव्हर्स स्विंग कसा करता येईल, या गोष्टीवर काम करायला सांगितले आहे. जे काम भारताचा कर्णधार म्हणून विराट कोहलीने करायला हवे होते, ते काम धोनी करताना दिसत आहे. यावरूनच धोनीची किती चांगले नेतृत्त्व करू शकतो, याची प्रचिती येऊ शकते.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीविराट कोहलीभारत विरुद्ध इंग्लंड