भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आहे. या सामन्यात पुन्हा एकदा जोस बटलरनं नाणेफेक जिंकली. आतापर्यंत पहिल्यांदा बॅटिंग घेऊन फसल्यानंतर त्यानं यावेळी पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे रोहित शर्मानं आम्हाला या मॅचमध्ये पहिल्यांदा बॉलिंग करायची होती, असे सांगितले. इंग्लंडचा संघ एका बदलासह मैदानात उतरला असून रोहित शर्मानं टीम इंडियात तीन बदलासह मैदानात उतरणार असल्याचे सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोहम्मद शमी, जड्डूसह वरुण चक्रवर्ती 'आउट'
मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिल्याची माहिती रोहित शर्मानं टॉसनंतर दिली. या दोघांच्या जागी अनुक्रमे अर्शदीप सिंग आणि वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. याशिवाय वरुन चक्रवर्ती किरकोळ दुखापतीमुळे प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. त्याच्या जागी कुलदीप यादव पुन्हा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.
भारतीय संघात बॅटिंगमध्ये प्रयोग पाहायला मिळणार?
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघानं लोकेश राहुलच्या तुलनेत अक्षर पटेलवर अधिक भरवसा दाखवला आहे. पहिल्या दोन सामन्यात त्याला बढती देण्यात आली. त्याने या संधीचं सोनंही केलं आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी लोकेश राहुलच्या माध्यमातून टीम इंडिया बॅटिंगमध्ये नवा प्रयोग करणार का? ते देखील पाहण्याजोगे असेल.
विराटला अखेरची संधी
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी विराट कोहलीचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. तो इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात कशी कामगिरी करतोय याकडेही सर्वांच्या नजरा असतील. याशिवाय सलामीवीर पहिल्यांदा बॅटिंग करताना संघाला कशी सुरुवात करून देणार त्याकडे सर्वांचे लक्ष असेल.
भारतीय प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन
फिलिप साल्ट (विकेट कीपर/बॅटर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), टॉम बेंटन, लियाम लिविंगस्टोन, गस एटकिंसन, आदिल रशीद, मार्क वुड, साकिब महमूद.
भारतीय संघानं नागपूरचं मैदान मारल्यावर कटकमध्ये दमदार विजय नोंदवत ३ सामन्यांची वनडे मालिका आधीच खिशात घातली आहे. तिसरा आणि अखेरचा सामना जिंकून पाहुण्या संघाला क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरला आहे. दुसरीकडे जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ मालिकेची सांगता विजयाने करण्यासाठी प्रयत्नशील असेल.