लंडन :  अनुभवी जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन याच्या पाच बळींच्या मदतीने इंग्लंडने भारताला पहिल्या डावात ३६४ धावांवर रोखले. त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या डावाची सतर्कतेने सुरूवात केली आहे. चहापानाच्या विश्रामापर्यंत इंग्लंडने बिना नुकसान २३ धावा केल्या होत्या. मात्र चहापानानंतर सिराजने पहिल्याच षटकांत डॉम सिबल आणि हसीब हमीद यांना सलग दोन चेंडूवर बाद करत इंग्लंडला बॅकफुटवर ढकलले.
भारताने आपले आठ बळी 97 धावात गमावले. कर्णधार विराट कोहली हा पहिल्या दिवशी अखेरच्या काही मिनिटात बाद झाला होता. तर दुसऱ्या दिवशी भारताने सात चेंडूतच लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे यांना गमावले. त्यानंतर रवींद्र जडेजा (१२० चेंडूत ४० धावा ) आणि ऋषभ पंत (५८ चेंडूत ३७ धावा) यांनी सहाव्या गड्यासाठी ४९ धावांची भागीदारी करत संघाला ३५० चा आकडा गाठून दिला. भारत चार गोलंदाजांसोबत मैदानात उतरला आहे. तळाच्या फलंदाजीतील कमतरता समोर आली. 
आणि त्या चारपैकी एकालाच खाते उघडता आले. इंग्लंडच्या गोलंदाजांपैकी फक्त अँडरसननेच कमाल केली. त्याने ६२ धावा देत पाच बळी घेतले. त्याने ३१ वेळा पाच बळी घेण्याची कामगिरी केली आहे. त्याला ओली रॉबिन्सन आणि मार्क वुड यांनी प्रत्येकी दोन बळी घेत साथ दिली. तर मोईन अली यानेही एक बळी घेतला.  सलामीवीर राहुल याने २५० चेंडूत १२९ धावा केल्या. त्यासोबतच रोहित शर्मा (८३), कोहली (४२), जडेजा आणि पंत यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.
रोरी बर्न्स आणि डॉम सिबले यांच्यावर इंग्लंडला चांगली सुरूवात करून देण्याची संधी होती. मात्र चहपानानंतर पहिल्याच षटकांत सिराजने दोन बळी घेतले. भारताची  दिवसाची सुरूवात मात्र निराशाजनक झाली. राहुल याने दोन धावा जोडल्याआणि बाद झाला. तर अँडरसनने रहाणेला बाद केले. त्याचसोबत कोहली, पुजारा आणि रहाणेचा खराब फॉर्म कायम राहिला. पंतने दोन चौकार लगावत दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर  फटका मारण्याच्या नादातच पंत बाद झाला. जडेजाने एका बाजुने धावा करण्याचा प्रयत्न केला. त्याला फक्त इशांतच साथ देऊ शकला. तळाचे इतर फलंदाज साफ अपयशी ठरले.  त्यामुळे दबावात फटका मारण्याच्या नादात रवींद्र जडेजा देखील बाद झाला.