लॉर्ड्स : पुन्हा एकदा फलंदाज ढेपाळल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी भारताला इंग्लंडविरुद्ध एक डाव आणि १५९ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. पहिल्या डावात २८९ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारताची चहापानापर्यंत ६ बाद ६६ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली होती. येथेच भारताचा पराभव निश्चित झाला होता. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी ४ बळी घेत भारताचे कंबरडे मोडले. या शानदार विजयासह इंग्लंडने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे.
लॉडर््सवर झालेल्या या सामन्याचा पहिला दिवस पावसाने धुतल्यानंतर इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी भेदक मारा करत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. पहिल्या दिवसानंतर मधेमधे पावसाचा व्यत्यय येत असतानाही इंग्लंडने केवळ १७०.३ षटकांमध्ये सामना जिंकला. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात पहिल्यांदाच भारताला एका डावाच्या अंतराने पराभव पत्करावा लागला. अँडरसन (४/२३) आणि ब्रॉड (४/४४) यांच्या भेदकतेपुढे भारताचा दुसरा डाव ४७ षटकात १३० धावांमध्ये संपुष्टात आला. भारताकडून केवळ हार्दिक पांड्या (२६) आणि रविचंद्रन अश्विन (३३*) यांनाच वीस धावांच्या पुढे जाता आले. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी ५५ धावांची भागिदारी करत भारताचा पराभव काहीकाळ लांबवला. या दोघांमुळे भारताला शंभर धावांचा पल्ला पार करता आला. चौथ्या दिवसातील पहिल्या दोन सत्रांमध्ये पावसामुळे निर्धारीत वेळेआधी खेळ थांबवावा लागला होता. दुसºया सत्रात भारताने २३ षटकांत केवळ ४९ धावा काढत ४ गडी गमावले. हे सर्व बळी ब्रॉडने मिळवले. त्याने भारताची मधली फळी उध्वस्त केली. अँडरसनने मुरली विजय - लोकेश राहुल ही सलामी जोडी फोडली. विजय शून्यावर परतला, तर राहुलला पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. विजयला बाद करत अँडरसनने लॉडर््स मैदानावर आपल्या बळींचे शतक पूर्ण केले.
यानंतर पावासामुळे निर्धारीत वेळेआधी लंच ब्रेक घेण्यात आला. त्यानंतर अँडरसनसह ब्रॉड आणि ख्रिस वोक्स यांचा स्विंग मारा बरसल्याने भारतीय संघ अडचणीत आला. कोहलीऐवजी वरच्या स्थानावर आलेला रहाणे (१३) छाप पाडण्यात अपयशी ठरला. यावेळी कोहलीवर सर्व मदार होती. पुजाराही चांगल्या लयीमध्ये दिसत असल्याने हे दोघे भारताला सावरतील असे दिसत होते. परंतु, ब्रॉडने प्रथम पुजाराचा (१७) त्रिफळा उडवल्यानंतर ३१व्या षटकात कोहली (१७) व कार्तिक (०) यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद करत भारताचा पराभव जवळपास निश्चित केला. यावेळी भारताची ६ बाद ६१ अशी अवस्था झाली होती.
तत्पूर्वी, इंग्लंडने पहिला डाव ७ बाद ३९६ धावांवर घोषित करुन २८९ धावांची आघाडी घेतली. चौथ्या दिवशी इंग्लंडने आक्रमक फटकेबाजीचा प्रयत्न केला. मात्र, मोहम्मद शमीपुढे (३/९६) त्यांना अपेक्षित यश आले नाही. शमीने ख्रिस वोक्स व कुरन यांना अनेकदा चकवले. हलक्या पावसाला सुरुवात झाल्याने कुरनने आक्रमक फटके मारले. मात्र, हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर तो बाद होताच कर्णधार रुटने डाव घोषित केला. कुरनने ४९ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ४० धावा, तर वोक्सने १७७ चेंडूत २१ चौकारांसह नाबाद १३७ धावांची खेळी केली.
धावफलक
भारत (पहिला डाव) : ३५.२ षटकात सर्वबाद १०७ धावा.
इंग्लंड (पहिला डाव) : ६ बाद ३५७ धावांवरुन पुढे.. ख्रिस वोक्स नाबाद १३७, सॅम कुरन झे. शमी गो. हार्दिक ४०. अवांतर - २३. एकूण : ८८.१ षटकात ७ बाद ३९६ धावा (घोषित). गोलंदाजी : इशांत शर्मा २२-४-१०१-१; मोहम्मद शमी २३-४-९६-३; कुलदीप यादव ९-१-४४-०; हार्दिक पांड्या १७.१-०-६६-३; रविचंद्रन अश्विन १७-१-६८-०.
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय झे. बेयरस्टो गो. अँडरसन ०, लोकेश राहुल त्रि. गो. अँडरसन १०, चेतेश्वर पुजारा त्रि. गो.
ब्रॉड १७, अजिंक्य रहाणे झे. जेनिंग्स गो. ब्रॉड १३, विराट कोहली झे. पोप गो. ब्रॉड १७, हार्दिक पांड्या पायचीत गो. वोक्स २६, दिनेश कार्तिक पायचीत गो. ब्रॉड ०, रविचंद्रन अश्विन नाबाद ३३, कुलदीप यादव त्रि. गो. अँडरसन ०, मोहम्मद शमी पायचीत गो. अँडरसन ०, इशांत शर्मा झे. पोप गो. वोक्स २. अवांतर - १२. एकूण : ४७ षटकात सर्वबाद १३० धावा. गोलंदाजी : जेम्स अँडरसन १२-५-२३-४; स्टुअर्ट ब्रॉड १६-६-४४-४ ; ख्रिस वोक्स १०-२-२४-२; सॅम कुरन ९-१-२७-०.
लॉर्डस्वर शतक ठोकणे स्वप्न होते : वोक्स
ऐतिहासिक लॉडर््स मैदानावर शतक ठोकणे बालपणाचे स्वप्न होते. ते पूर्ण झाल्याची जाणीव अविश्वसनीय आहे,’ असे प्रदीर्घ काळापर्यंत कसोटी संघातून बाहेर राहिलेल्या ख्रिस वोक्स याने म्हटले. वोक्स म्हणाला, ‘लॉर्डस्वर बॅट उचलून सन्मानाने प्रेक्षकांच्या अभिवादनाचा स्वीकार करणे बालपणाचे स्वप्न होते. ते पूर्ण झाल्यानंतर अद्भुत जाणीव झाली आहे.’
मुरली ठरला सहावा फलंदाज
लॉर्ड्स कसोटीच्या दुसºया डावातही सलामीवीर मुरली विजय भोपळा न फोडता बाद झाला. दोन्ही डावांत विजयच्या धावांची पाटी कोरीच राहिली आणि अशी कामगिरी करणारा तो भारताचा सहावा फलंदाज ठरला आहे. याआधी पंकज रॉय (१९५२), फारुख इंजिनियर (१९७५), वसिम जाफर (२००७), विरेंद्र सेहवाग (२०११) व शिखर धवन (२०१५) यांना एकाच सामन्यातील दोन डावांत भोपळाही फोडता आला नव्हता.