चेन्नई : विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी धडपडणाऱ्या भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने इंग्लंडविरुद्ध आज, शनिवारपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीविषयी मोठे वक्तव्य केले. ‘चेपॉकची खेळपट्टी वेगळ्या धाटणीची दिसत असून ती पहिल्या दिवसापासून फिरकीला पूरक ठरेल,’ असे अजिंक्यला वाटते. भारताने पहिला सामना येथेच २२७ धावांनी गमावला. त्या सामन्यात सुरुवातीच्या दोन दिवसात पाटा ठरलेल्या खेळपट्टीने नंतर तीन दिवस गोलंदाजांना साथ दिली. यावेळी खेळपट्टीवर गवत आणि नरमपणा कमी आहे. यामुळे फिरकीला उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.
रहाणे म्हणाला, ‘ही खेळपट्टी वेगळी भासते. माझ्यामते पहिल्या दिवसापासून फिरकीला पूरक ठरेल. पहिल्या सत्रात खेळपट्टीपासून कसा अनुभव येतो हे पाहावे लागेल. पहिल्या सामन्यातील कटू आठवणी विसरून आता सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची गरज असेल. अक्षर पटेल फिट आहे, ही आनंदाची बातमी आहे. पण अंतिम एकादशमध्ये कोण खेळेल, हे आताच सांगता येणार नाही.’
‘पहिल्या सामन्यात फिरकीपटूंनी केलेल्या कामगिरीवर चिंताग्रस्त नाही. आम्ही सुरुवातीच्या दोन दिवसात १९० षटके टाकली. त्यांनी ५७८ धावा केल्या. आमचा मारा चांगलाच होता,’ असे रहाणेने स्पष्ट केले.
इंग्लंड संघात चार बदल
भारताविरद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या लढतीसाठी इंग्लंडने शुक्रवारी जाहीर केलेल्या १२ सदस्यांच्या संघात चार बदल केले आहेत. त्यात अनुभवी जेम्स अँडरसनला विश्रांती देण्यात आली असून स्टुअर्ट ब्रॉडचा समावेश करण्यात आला आहे.
कर्णधार ज्यो रूटने सांगितले की, अंतिम १२ खेळाडूंमध्ये ब्रॉडव्यतिरिक्त डोम बेसच्या स्थानी मोईन अली, यष्टिरक्षक जोस बटलरच्या स्थानी बेन फोक्स यांचा समावेश करण्यात आला आहे. बटलर पहिल्या कसोटीनंतर रोटेशन नीतीनुसार मायदेशी परतला आहे. जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त असून त्याच्या स्थानी अष्टपैलू ख्रिस्ट व्होक्स किंवा नवा वेगवान गोलंदाज ऑली स्टोन यांच्यापैकी एकाचा समावेश करण्यात येईल.