चेन्नई : येथे इंग्लंडविरुद्ध १३ फेब्रुवारीपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात किमान एक बदल शक्य असेल. पहिल्या सामन्यात निराशादायी कामगिरीनंतर झारखंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीम याला बाहेरचा रस्ता दाखविला जाण्याची शक्यता आहे. नदीमचा पर्याय कोण याचा निर्णय शुक्रवारपर्यंत होऊ शकतो. तथापि सामन्यासाठी फिट असलेला अक्षर पटेल हा त्याचे स्थान घेऊ शकतो.
मंगळवारी संपलेल्या पहिल्या कसोटीत भारताचा दारुण पराभव झाला. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्रांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, अक्षरच्या गुडघ्याला किरकोळ जखम झाली होती, पण तो नेटवर फलंदाजी करीत आहे. उद्यापासून तो गोलंदाजीदेखील करेल, अशी अपेक्षा आहे.
पहिल्या कसोटीसाठीदेखील तो प्रथम पसंती होताच. दुसऱ्या सामन्यात त्याला खेळविण्याचा निर्णय कर्णधार विराट कोहली, मुख्य कोच रवी शास्त्री आणि गोलंदाजी कोच भरत अरुण यांच्यावर विसंबून असेल.’
वॉशिंग्टन सुंदर याने पहिल्या डावात २६ षटकात ९८ धावा दिल्या. दुसऱ्या डावात त्याला एक षटक टाकायला मिळाले. पहिल्या डावात फलंदाजीत त्याने चांगले योगदान दिल्यामुळे दुसऱ्या सामन्यात अंतिम एकादशमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. अश्विनला दुसऱ्या डावात फलंदाजीदरम्यान जोफ्रा आर्चरचा बाऊन्सर हाताला लागला होता. पण तो फिट असल्याचे निष्पन्न झाले आहे.
भारताकडून सर्वोत्कृष्ट मारा करणाऱ्या या ऑफस्पिनरला स्कॅनसाठी नेण्याची गरज भासली नाही. पुढील तीनही सामन्यात अनुभवी अश्विनची उपस्थिती अत्यावश्यक आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्यात चांगली खेळपट्टी मिळेल, असा विश्वास संघ व्यवस्थापनाला वाटतो.
खेळपट्टीकडे दोन्ही संघांची नजर
चेन्नईत पहिल्या कसोटीत पाटा खेळपट्टी होती. दुसऱ्या सामन्याआधी टीएनसीएचे क्यूरेटर व्ही. रमेश कुमार आणि बीसीसीआयच्या खेळपट्टी व मैदान समितीचे प्रमुख तापोस चॅटर्जी यांच्यापुढे नाणेफेकीला महत्त्व नसेल, अशी खेळपट्टी तयार करण्याचे आव्हान आहे. दुसऱ्या सामन्यासाठी वापर होणाऱ्या खेळपट्टीवर सध्या गवत आहे. मात्र चेंडू अधिक वळण घेईल, असे मानले जात आहे. पुढील तीन दिवस किती पाणी देण्यात येईल किंवा उन्हामुळे टणक खेळपट्टी देण्यात आल्यास त्यावर भेगा जाण्याचीदेखील शक्यता नाकारता येणार नाही.
नदीमने टाकले नऊ नो बॉल
कोहलीने पराभवानंतर नदीमबाबत नाराजी व्यक्त करताना बुमराह, ईशांत आणि अश्विन यांनी जे दडपण निर्माण केले ते नदीम कायम राखू शकला नव्हता, असे म्हटले होते. नदीमने सामन्यात चार गडी बाद केले पण मोबदल्यात दोन्ही डावांत ५९ षटकात २३३ धावा मोजल्या होत्या.
फिरकी गोलंदाज असतानादेखील सामन्यात नऊ नो बॉल टाकले. गोलंदाजी करताना क्रीजवर उडी घेतेवेळी माझ्या टायमिंगमध्ये तांत्रिक चूक असल्याची कबुली देत नेटमध्ये यावर तोडगा काढण्याची अपेक्षा नदीमने व्यक्त केली होती.
(ऑगस्ट २०२० पासून) (ऑगस्ट २०१८ ते जुलै २०)
गोलंदाज षटके नो बॉल षटके नो बॉल
नाथन लियोन १८७ ०० ८९५.४ ००
यासिर शाह २३१.४ २ ४८९ ००
रवींद्र जडेजा ३७.३ ३ ४५५.३ ३
आर. अश्विन २०६.५ ५ ४४५.१ ००
तायजुल इस्लाम ७८.१ २ ४२४.२ १
डी. परेरा ९३.१ ४ ४२३.२ १
एल. एम्बुल्डेनिया ११९ ८ ३३८.३ १
रोस्टन चेस ३० ०० ३२८.३ ००
केशव महाराज १४२.१ ३ ३२०.४ १
जे. लीच १६०.५ ४ २९४.२ १
(फिरकी गोलंदाजांनी नो बॉल टाकायला नको. पण त्याने स्वत:च्या गोलंदाजीत उणिवा दाखवून दिल्या. ऑस्ट्रेलियाचा नाथन लियोन याने करिअरमध्ये २४ हजार ५६८ चेंडू टाकले, मात्र एकाही नो बॉलची नोंद नाही.)