मुंबई - भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या कसोटी संघातील सदस्य असलेला अर्जुन तेंडुलकर श्रीलंका दौऱ्यावरून थेट इंग्लंडमध्ये दाखल झाला. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा पुत्र असलेल्या अर्जुनने श्रीलंका दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला बळी टिपला आणि तो प्रसिद्धीत आला. इंग्लंडमध्येही लॉर्ड्स कसोटीपूर्वी त्याने भारतीय संघासोबत गोलंदाजीचा सराव केला. मात्र दुसऱ्या कसोटीत तो मैदानावर दिसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
लॉर्ड्स कसोटीपूर्वीच्या सराव सामन्यात अर्जुनने भारतीय संघासोबत सराव केला. डावखुरा गोलंदाज सॅम कुरनचा सामना करण्यासाठी भारतीय फलंदाजांना अर्जुनने गोलंदाजी करून मदत केली. सराव सत्रात त्याने सलामीवीर लोकेश राहुलला बाद केले आणि सर्वांनी त्याचे कौतुकही केले.
अशीच एक कौतुकास्पद कामगिरी अर्जुनने शुक्रवारी केली. पावसाच्या सततच्या व्यत्ययात पार पडलेल्या या सामन्यात अर्जुनने ग्राऊंड्समन्सला सहकार्य केले. त्याच्या या कामगिरीचे लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या व्यवस्थापनाने प्रशंसा केली.
जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर अर्जुनने पहिल्या कसोटीत दोन विकेट घेतल्या,पण त्याला धावा करण्यात अपयश आले. दुसऱ्या कसोटीत त्याने एक विकेट घेत १४ धावा केल्या.