कटक: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कटकच्या मैदानात रंगणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा 'हिटमॅन' ते 'फ्लॉपमॅन' अशा गर्तेत सापडला आहे. त्याला सूर गवसणार का? पहिल्या सामन्यातून बाहेर राहिलेला दिग्गज विराट कोहली दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याकडे सर्वांच्या नजरा असतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोहली खेळणार की नाही?भारताने नागपुरात चार गडी राखून दमदार विजय साजरा करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता विजयी मोहीम सुरू ठेवत मालिका विजयाचे लक्ष्य असेल. कोहलीच्या उजव्या गुडघ्यावर सूज असल्याने तो पहिला सामना खेळला नव्हता. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी त्याच्या फिटनेसची चिंता वाढली. उपकर्णधार शुभमन गिल याने मात्र कोहली दुसरा सामना खेळेल, हे आधीच स्पष्ट केले आहे.
रणजी मॅच खेळला, पण कोहलीचे तेवर नाही दिसले
कोहली आज सहज वाटला. तो खेळणार असेल तर संघ व्यवस्थापनाला अंतिम एकादश निवडण्यासाठी बरेच डोके खाजवावे लागेल. नागपुरात कोहलीऐवजी खेळलेल्या श्रेयस अय्यरने ३६ चेंडूंत ५९ धावा करीत संघात स्थान निश्चित केले होते. कोहलीला अय्यरऐवजी स्थान दिले जाईल की सलामीला अपयशी ठरलेल्या यशस्वी जैस्वालऐवजी खेळविले जाईल, याचे संकेत मिळालेले नाहीत. यशस्वी बाहेर राहिल्यास रोहितच्या सोबतीला शुभमन गिल सलामीला खेळेल. कोहली धावा कधी काढणार, असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. फॉर्ममध्ये परतण्यासाठी त्याने दिल्लीकडून रणजी सामना खेळला. त्यात केवळ सहा धावा करता आल्या.
त्या अर्धशतकानंतर रोहितची बॅट तळपलीच नाही
रोहितदेखील धावांसाठी संघर्ष करीत असून, मागच्या सामन्यात दोन धावा केल्या. मागच्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध कोलंबोत ५४ धावा केल्यापासून एकाही प्रकारात त्याने अर्धशतकी खेळी केलेली नाही. दुसऱ्या सामन्यात धावांचा दुष्काळ कायम राहिल्यास त्याच्या भवितव्याच्या चर्चेला आणखी बळ मिळेल.
जवळपास सहा वर्षांनी १ भारतीय संघ कटकच्या मैदानात वनडे सामना खेळणार आहे. या मैदानात खेळविण्यात आलेल्या २१ वनडेतील २ सामने अनिर्णीत राहिले असून १२ सामन्यांत धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने हे मैदान मारले आहे. फक्त ७ सामन्यांत पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे विजय मिळाला. कटकच्या खेळपट्टीवर पहिल्यांदा फलंदाजी करतानाची सरासरी धावसंख्या २२५-२३० धावा अशी आहे.
कटकच्या मैदानात इंग्लंडपेक्षा भारत भारी!
भारतीय संघाने कटकच्या बाराबती स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध १० वनडे सामने खेळले आहेत. यातील ६ सामन्यांत टीम इंडियाने बाजी मारली. उर्वरित ४ सामन्यांत पाहुण्या इंग्लंड संघाने मैदान गाजवले. २०१७ मध्ये या मैदानात भारत- इंग्लंड यांच्यातील अखेरचा सामना खेळविण्यात आला होता. हा शेवटचा सामना भारतीय संघानेच जिंकला होता. २०१७ मध्येच भारतीय संघाने या मैदानात ३८१ धावा केल्या होत्या.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १९ जानेवारी २०१७ रोजी कटकच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताच्या ताफ्यातील दोघांनी धडाकेबाज शतक झळकावले होते. युवराज सिंगने १२७ चेंडूंत २१ चौकार आणि ३ षट्कारासह १५० धावा कुटल्या होत्या. त्याच्याशिवाय महेंद्रसिंह धोनीने १२२ चेंडूंत १३४ धावांची दमदार खेळी केली होती. त्याच्या भात्यातून १० चौकार आणि ६ षट्कार पाहायला मिळाले होते.
१४ हजार धावा दृष्टिक्षेपात...
'वनडे'त कोहली १४००० धावांपासून ९४ धावा दूर आहे. ही उपलब्धी गाठल्यास सचिन तेंडुलकर (१८,४२६) आणि कुमार संगकारा (१४,२३२) यांच्यानंतरचा तो तिसरा फलंदाज ठरेल.
भारताचे गोलंदाज सुसाट...
भारताची गोलंदाजी भेदक ठरली. वेगवान मोहम्मद शमीने पुनरागमनात दमदार मारा केला. फिरकी गोलंदाजही प्रभावी ठरले होते. 'वनडे' पदार्पण करणारा हर्षित राणा याच्या एका षटकात फिल सॉल्टने २६ धावा ठोकल्या खऱ्या; पण नंतर राणाने बेन डकेट आणि हॅरी बुक यांना माघारी धाडले. बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत फिट न झाल्यास राणाकडे त्याचे स्थान घेण्याची संधी असेल.
सामना दुपारी १.३० पासून
थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस
लाइव्ह स्ट्रीमिंग डिझ्नी हॉटस्टार