लंडन : भारताचा कर्णधार विराट कोहली लवकरच फॉर्ममध्ये परत येईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत इंग्लंडविरुद्ध मालिकेत दोन शतके निश्चितपणे झळकवू शकतो, असे भाकित इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने केले आहे. कोहलीने नोव्हेंबर २०१९ ला बांगलादेशविरुद्ध अखेरचे कसोटी शतक साजरे केले होते.२०२० मध्ये कोरोनामुळे कसोटी क्रिकेट कमीच झाले. जे सामने झाले, त्यात त्याला शतक झळकवता आले नाही. पदार्पणापासून शतक ठोकता न आलेले हे त्याचे पहिले वर्ष आहे. चेन्नई कसोटीत पहिल्या डावात विराटने ४८ चेंडूत केवळ ११ धावा केल्या.
सामान्यपणे विराट सकारात्मक खेळीसाठी परिचित आहे; पण इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याच्यावर वर्चस्व गाजवले. डाैम बेसचा ऑफ स्पिन चेंडू पुढे जात खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या बॅटची कड घेत शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करीत असलेल्या ओली पोपच्या हातात जाऊन विसावला होता.
विराटबद्दल वॉन म्हणाला,‘मी कोहलीबाबत चिंतेत नाही. माझ्या मते तो स्वत: चिंतेत नसावा. मालिकेत दोन शतके तरी तो मारू शकेल. सध्या ज्या चेंडूवर बाद झाला, तो चुकीचा म्हणावा लागेल. ऑफ स्टम्पबाहेर ऑफ स्पिनरला तुम्ही बचावात्मक खेळू शकत नाही.’