India vs England 1st Test: कुरनच्या फटकेबाजीने सामन्यात रंगत, भारतासमोर 194 धावांचे लक्ष्य
एडबॅस्टन - इंग्लंडचा डाव 180 धावांवर आटोपल्यामुळे भारताला विजयासाठी 194 धावांचे आव्हान मिळाले आहे. मात्र, टीम इंडियाची सुरुवात अतिशय संथ झाली. त्यातच, मुरली विजय केवळ 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर, शिखर धवन 13 आणि लोकेश राहुलही 13 धावा काढून झेलबाद झाले. त्यामुळे भारतीय संघाची मदार कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेवर आली. पण, रहाणेही केवळ 2 धावांवर बाद झाल्यामुळे भारताची धावसंख्या 4 बाद 63 अशी झाली होती. राहणेनंतर अश्विनही 13 धावा काढून बाद झाला. त्यामुळे शंभरीच्या आतच भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे.
शिखर धवनच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे जीवदान मिळालेल्या 20 वर्षीय सॅम कुरनने भारतीय गोलंदाजांचीच फिरकी घेतली. त्याने जोरदार फटकेबाजी करताना कसोटीतील पहिले अर्धशतक झळकावून इंग्लंडला 180 धावांचा पल्ला गाठून दिला. आर अश्विनच्या गोलंदाजीवर मोठ्या आत्मविश्वासाने त्याने एकाच षटकात दोन उत्तुंग षटकार खेचले आणि तेही पुढे येऊन... त्यात उमेश यादवच्या गोलंदाजीवर तिन्ही स्टम्प मोकळे सोडून ऑफसाईटला टोलावलेला चेंडू प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेला. उमेश यादवने त्याचा अडथळा दूर करताना भारताला दिलासा दिला, परंतु विजयासाठीचे 194 धावांचे लक्ष्य या खेळपट्टीवर पार करणे सहज शक्य नक्की नाही.
आर अश्विन आणि
इशांत शर्मा हे गोलंदाजीत प्रभाव पाडत असताना शिखर धवनचे ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा भारतीय संघाला फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पहिल्या कसोटीच्या दुस-या डावात इंग्लंडचा संघ स्वस्तात गुंडाळला जाईल अशी चिन्हे होती. मात्र, सॅम कुरन आणि आदिल रशीद यांनी इंग्लंडच्या डावाला आकार दिला. हे दोघेही वैयक्तीक 13 धावांवर असताना धवनने स्लीपमध्ये त्यांचा सोपा झेल सोडला. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 48 धावांची भागिदारी केली. रशीदला यादवने त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. कुरनने मात्र फटकेबाजी करताना अर्धशतक पूर्ण केले. कुरनने 65 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांतसह 63 धावांची खेळी केली. स्टुअर्ट ब्रॉडला बाद करून इशांतने आणखी एक विक्रम नावावर केला.