‘भारताचा कर्णधार विराट कोहलीचा मिळवलेला बळी माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम बळी ठरला. संघाच्या कामगिरीवर खूश असून पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर आम्ही चांगल्या स्थितीत आहोत,’ अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा ऑफ स्पिनर डॉम बेस याने दिली.
पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेल्या बेसने हुकमी कोहलीला (११) स्वस्तात बाद केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बेस म्हणाला की, ‘कोहलीचा मिळवलेला बळी नक्कीच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कोहली शानदार आणि जबरदस्त गुणवत्तेचा खेळाडू आहे. गोलंदाजी एक प्रक्रिया असून मी अद्याप हे शिकतोय. मी सध्या २३ वर्षांचा असून मला पुढे वाटचाल करायची आहे. हा प्रवास नक्कीच उतार-चढावांचा ठरेल. या खेळपट्टीमुळे माझा आत्मविश्वास वाढला. सामन्यादरम्यान मी याचा अजिबात विचार करणार नसून अजून आम्हाला बरीच मजल मारायची आहे.’